
परभणी, 04 मे (हिं.स.)।
पुणे जिह्यातील नरसापूर येथील तीन वर्षीय चिमुकलीवर केलेल्या अमानुष अत्याचारासह तीच्या निर्घृण खून प्रकरणात संबंधित नराधमा विरोधात राज्य सरकारने कठोर भूमिका घ्यावी, त्यास फासावर लटकवावे, अशी मागणी शहरातील विविध पक्ष, संघटना व प्रतिष्ठानांच्या पदाधिकार्यांसह कार्यकर्त्यांनी जिल्हा प्रशासनास सादर केलेल्या निवेदनाद्वारे केली.
भाजपाद्वारे कठोर कारवाई करण्याची मागणी...
भारतीय जनता पार्टीच्या अनुसूचित जाती मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष प्रा. सौ. रमा शेजावळे, महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षा सौ. मनिषा जाधव, तसेच सौ. रुपाली ठाकरे, सौ. पुनम शर्मा, सौ. सुप्रिया कुलकर्णी, विश्वजित देशमुख, संजय रिझवानी, धनंजय जाधव यांच्यासह अन्य पदाधिकार्यांनी जिल्हा प्रशासनास एक निवेदन सादर करीत नरसापूर घटनेचा तीव्र निषेध केला. मनाला चीड आणणारी, माणूसकीला काळीमा फसणारी, अत्यंत वेदनादायी, क्रुर व निंदनीय घटनेचा सर्व स्तरावर जोरदार निषेध झाला पाहिजे व संबंधित आरोपीस फासावर लटकेपर्यंत भक्कम असा पाठपुरावा केला पाहिजे, अशी अपेक्षा या शिष्टमंडळाने व्यक्त केली.
संभाजी ब्रिगेडद्वारे तीव्र शब्दात निषेध....
संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष गजानन जोगदंड यांच्या नेतृत्वाखालील एका शिष्टमंडळानेही जिल्हा प्रशासनास निवेदन सादर करीत या घटनेचा निषेध केला. तसेच महिलांच्या सुरक्षिततेबाबत गृह खात्याने अधिक जागरुक रहावे, संरक्षणा संदर्भात व्यापक उपाययोजना कराव्यात भविष्यात अशा घटना घडणार नाहीत याची दक्षता घ्यावी, या प्रकरणात संबंधित पोलिस अधिकार्याविरुध्द निष्काळजीपणा केल्याबद्दल कठोर कारवाई करावी, अशीही मागणी संभाजी ब्रिगेडच्या पदाधिकार्यांनी केली.
जिल्हा कोचिंग क्लासेस असोसिएशनतर्फे निषेध..
परभणी जिल्हा कोचिंग क्लासेस असोसिएशनचे सचिव विश्वंभर काठवटे, राजेश रणखांबे, दिलीप घुंबरे, श्रीकांत जोशी, मारोती जाधव यांच्यासह अन्य पदाधिकार्यांनी सोमवारी जिल्हा प्रशासनास एक निवेदन सादर केले. त्याद्वारे नरसापूर येथील तीन वर्षीय चिमुकलीवरील घटनेचा तीव्र शबत निषेध केला. संबंधित आरोपी विरोतधात कठोरात कठोर कारवाई करावी, तसेच या प्रकरणात निष्काळजीपणा करणार्या पोलिस अधिकार्यांविरोधातही कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली.
शिवसेनेच्या शिंदे गटाद्वारे निषेध....
शिवसेना शिंदे गटाचे महानगरप्रमुख माणिकराव पौंढे पाटील यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेच्या एका शिष्टमंडळाने सोमवारी जिल्हा प्रशासनास निषेधाचे पत्र सादर केले. तसेच संबंधित आरोपीच्या विरोधात कठोर भूमिका घ्यावी, अशी मागणी केली.
---------------
हिंदुस्थान समाचार / Chaitanya JayantRao Chitnis