
रत्नागिरी, 04 मे (हिं.स.) । रत्नागिरी एज्युकेशन सोसायटीच्या नावीन्यपूर्ण प्रयोगशाळेसाठी (फूड टेस्टिंग लॅब) पुढच्या दोन महिन्यांत एक कोटी रुपये देऊ, अशी घोषणा राज्याचे उद्योगमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांनी आज येथे केली.
संस्थेच्या अभ्यंकर-कुळकर्णी कनिष्ठ महाविद्यालयाच्या सुवर्णमहोत्सव सांगता समारंभाच्या कार्यक्रमात ते बोलत होते. सोमवारी सकाळी खातू नाट्यमंदिरात हा कार्यक्रम झाला.
यावेळी श्री. सामंत म्हणाले की, उच्च व तंत्रशिक्षण मंत्री होतो तेव्हा रत्नागिरी हे शैक्षणिक हब होण्यासाठी प्रयत्न केले. रत्नागिरीत वैद्यकीय महाविद्यालय, अभियांत्रिकी कॉलेज, कौशल्य विकास केंद्र, संस्कृत विद्यापीठ आहे. ज्यामुळे विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी बाहेर जाण्याची आवश्यकता भासणार नाही. महाराष्ट्रात रत्नागिरी एज्युकेशन सोसायटीसारखी संस्था नाही, हे मी अभिमानाने सांगेन. मी या कॉलेजचा माजी विद्यार्थी असल्याचे मी अभिमानाने सांगतो. संस्थेने शासनासोबत सामंजस्य करार केल्यास कौशल्य विकासाचे नवनवे अभ्यासक्रम चालू करता येतील. संस्थेला त्यासाठी पैसे खर्च करावे लागणार नाहीत. महाविद्यालयाच्या प्रत्येक माजी विद्यार्थ्याशी संस्थेने संपर्क साधावा, त्यातून संस्थेची दुप्पट प्रगती होईल. हजारो विद्यार्थ्यांनी परदेशात नाव कमावले आहे. हे सर्व विद्यार्थ्यांचे आयडॉल झाले पाहिजेत.
कार्यक्रमात मंचावर नगराध्यक्ष सौ. शिल्पा सुर्वे, संस्थेच्या कार्याध्यक्ष शिल्पा पटवर्धन, उपकार्याध्यक्ष अॅड. विजय साखळकर, उपाध्यक्ष डॉ. मुकुंद जोशी, अॅड. विलास पाटणे, कार्यवाह सतीश शेवडे, सहकार्यवाह प्रा. श्रीकांत दुदगीकर, शालेय समितीचे अध्यक्ष आनंद देसाई, विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष मुन्नाशेठ सुर्वे, देणगीदार प्रतिनिधी आनंद अभ्यंकर आणि निरंजन कुळकर्णी, प्राचार्य डॉ. मकरंद साखळकर, उपप्राचार्य प्रा. सुनील गोसावी, आजीव सदस्य मंडळाचे अध्यक्ष महेश नाईक आणि नियामक मंडळ सदस्य मनोज पाटणकर, जि. प. सदस्य बाबू म्हाप व माजी विद्यार्थी प्रतिनिधी बिपीन बंदरकर आदी उपस्थित होते.
संस्थापक बाबुराव जोशी व मालतीबाई जोशी यांना अभिवादन करून कार्यक्रमाला सुरवात झाली. प्रास्ताविकामध्ये आनंद देसाई म्हणाले की, बाबुराव जोशी व मालतीबाई जोशी यांच्या पुण्याईने संस्था भारतात नावारूपाला येत आहे. २२ घटकसंस्थांचा नावलौकिक वाढत आहे. त्यांनी लावलेल्या रोपट्याचा वटवृक्ष झाला आहे. संस्था आता नवीन प्रयोगशाळा चालू करत आहे. यामध्ये अल्प दरामध्ये शेतकरी आंबा बागायतदारांना व व्यावसायिकांना खाद्यपदार्थ चाचणी करण्यासाठी उपलब्ध करून देणार आहोत.
प्राचार्य डॉ. मकरंद साखळकर यांनी संस्थेच्या प्रगतीचा आढावा घेतला. अॅड. पाटणे यांनी निवासी स्पर्धा परीक्षा केंद्र निर्माण करण्याची मागणी पालकमंत्र्यांकडे केली. डॉ. मुकुंद जोशी यांनी बाबुराव जोशी यांच्या आठवणी सांगितल्या. शिवछत्रपती पुरस्कार विजेती माजी विद्यार्थिनी ऐश्वर्या सावंत, नगराध्यक्ष सुर्वे, प्रमुख देणगीदार श्री. कुळकर्णी आणि श्री. अभ्यंकर यांचा सन्मान करण्यात आला. महाविद्यालयाच्या आठवणींच्या स्मरणिकेचे प्रकाशन मान्यवरांनी केले.
अध्यक्षीय भाषणात शिल्पाताई पटवर्धन यांनी संस्था दर्जात्मक सुधारण्यासाठी प्रयत्न करत असल्याचे सांगितले. सूत्रसंचालन प्रा. वैभव कानिटकर यांनी केले. आभार उपप्राचार्य सुनील गोसावी यांनी मानले. वेदा वाटवे हिने पसायदान सादर केले.
---------------
हिंदुस्थान समाचार / रत्नागिरी