
पुणे, 06 मे (हिं.स.)। पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या क्रीडा,कला व साहित्य समितीची आढावा बैठक समितीचे सभापती कैलास कुटे यांच्या अध्यक्षतेखाली पिंपरी येथील मुख्य प्रशासकीय भवनातील दिवंगत महापौर मधुकर पवळे सभागृहात पार पडली. या बैठकीत शहरातील क्रीडा,कला व साहित्य क्षेत्राच्या विकासासाठी चार महत्त्वाच्या प्रस्तावांना मान्यता देण्यात आली. तसेच शहराच्या क्रीडा,कला,साहित्य व सांस्कृतिक धोरणांवर सखोल व सकारात्मक चर्चा करण्यात आली.
या बैठकीस विरोधी पक्षनेते तथा समिती सदस्य भाऊसाहेब भोईर,शाम जगताप,धर्मपाल तंतरपाळे,तानाजी बारणे,योगेश लांडगे,जितेंद्र ननावरे तसेच उपआयुक्त पंकज पाटील आणि जनसंपर्क अधिकारी प्रफुल्ल पुराणिक उपस्थित होते.
बैठकीत शहरातील नागरिक,खेळाडू,कलाकार आणि महिलांच्या सक्षमीकरणासाठी लोकाभिमुख प्रस्ताव सादर करण्यात आले. सभापती कैलास कुटे यांच्या पुढाकारातून मांडण्यात आलेल्या या प्रस्तावांद्वारे शहराच्या सर्वांगीण विकासासोबतच क्रीडा,सांस्कृतिक आणि सामाजिक क्षेत्रात सकारात्मक बदल घडवून आणण्याचा उद्देश व्यक्त करण्यात आला.
या बैठकीत मंजूर करण्यात आलेले ठराव शहराच्या क्रीडा,कला,साहित्य व सांस्कृतिक क्षेत्राच्या विकासासाठी महत्त्वपूर्ण ठरणार आहेत. या निर्णयांमुळे शहरातील खेळाडू,कलाकार आणि नागरिकांना अधिक संधी व सुविधा उपलब्ध होतील. तसेच महिलांच्या सहभागात वाढ होऊन सामाजिक सक्षमीकरणाला चालना मिळेल. आगामी काळात या सर्व योजनांची प्रभावी अंमलबजावणी करून पिंपरी चिंचवड शहराला क्रीडा व सांस्कृतिक क्षेत्रात अग्रस्थानी नेण्याचा आमचा प्रयत्न राहील.
---------------
हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु