
सोलापूर, 06 मे, (हिं.स.)। जुन्या वादातून आणि दाखल केलेली केस मागे न घेतल्याच्या रागातून रफिक नगर परिसरात झालेल्या सुरेश श्रीराम (३५) यांच्या निर्घृण हत्या प्रकरणातील सहा आरोपींना न्यायालयाने ८ मेपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
रविवार रोजी सुरेश श्रीराम हे आपल्या दुचाकीवरून जात असताना, पूर्ववैमनस्यातून आरोपींनी त्यांना अडवले. फिर्यादीनुसार, मुख्य आरोपी विजय श्रीराम याने काठीने मारहाण करण्यास सुरुवात केली, तर रोहित, सुभाष, करण आणि सुमित यांनी धारदार कोयत्याने सुरेश यांच्यावर सपासप वार केले. याच वेळी आरोपी राहुल याने सुरेश यांच्या डोक्यात दगड घालून त्यांना गंभीर जखमी केले. या हल्ल्यात सुरेश यांचा मृत्यू झाला.या प्रकरणी मृत सुरेश यांची पत्नी लक्ष्मी श्रीराम यांनी जेलरोड पोलीस ठाण्यात फिर्यादवरून विजय श्रीराम, रोहित आण्णारेड्डी, करण श्रीराम, सुमित श्रीराम, राहुल आण्णारेड्डी, सुभाष सगडा यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अटकेनंतर आरोपींना न्यायालयात हजर करण्यात आले.गुन्ह्यात वापरलेली धारदार शस्त्रे, दगड आणि वापरलेली वाहने जप्त करण्यासाठी आरोपींची पोलीस कोठडी आवश्यक असल्याचे सरकारी वकिलांनी नमूद केले.दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकल्यानंतर न्यायदंडाधिकारी एम. पी. मर्देकर यांनी सहाही आरोपींना ८ मेपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले.या खटल्यात सरकारतर्फे ॲड. तुषार लिमन यांनी काम पाहिले, तर मूळ फिर्यादीतर्फे ॲड. अजमोद्दीन शेख आणि ॲड. धनंजय येमूल यांनी युक्तिवाद केला.
---------------
हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड