
बीड, 06 मे, (हिं.स.)। गेवराई तालुक्यातील उमापूर येथे लग्नाचे आमिष दाखवून तरुणांना लुटणाऱ्या एका मोठ्या टोळीचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. लग्नाळू तरुणांना हेरून त्यांचे बनावट लग्न लावून देणे आणि त्यानंतर दागिने व रोकड घेऊन पसार होणाऱ्या या टोळीने आतापर्यंत आठ जणांची फसवणूक केली आहे. उमापूर येथील या तरुणाची सुमारे आठ लाख रुपयांना फसवणूक झाल्यानंतर हा सर्व प्रकार समोर आला असून, पीडित तरुणाने बीड पोलीस अधीक्षकांकडे न्याय मागितला आहे. या प्रकरणातील धक्कादायक बाब म्हणजे, संबंधित नवरी मुलीने स्वतःच आपल्या मागील आठ लग्नांचे फोटो नवव्या पतीला पाठवून या टोळीच्या कारभाराचा पर्दाफाश केला.
या टोळीची कार्यपद्धती अत्यंत नियोजित असून गावातीलच काही ओळखीच्या मध्यस्थांमार्फत हा जाळा विणला जातो. कोपरगाव येथील एका १९ वर्षीय तरुणीचे स्थळ दाखवण्यात आले होते. लग्नासाठी साडेतीन लाख रुपयांची मागणी करण्यात आली होती, मात्र अखेर तीन लाख रुपयांत हा सौदा निश्चित झाला. त्यानंतर उमापूर येथील मंदिरात मोठ्या थाटामाटात हा विवाह सोहळा पार पडला. या लग्नासाठी आणि इतर व्यवहारांसाठी सुमारे आठ लाख रुपये खर्च केले होते. मात्र, लग्न होताच नवरीने आपले खरे रूप दाखवण्यास सुरुवात केली आणि सासरच्या मंडळींना त्रास देण्यास प्रारंभ केला.
फसवणुकीचा हा कट पूर्ण करण्यासाठी नवरीने घरात अडथळा ठरणाऱ्या आपल्या सासूला भांडण करून पुण्याला दुसऱ्या मुलाकडे जाण्यास भाग पाडले. घरात कुणीही नसल्याची संधी साधून ही नवरी घरातील सोन्याचे दागिने घेऊन पसार झाली. तपासादरम्यान असे समोर आले की, एजंट आणि त्याची पत्नी नवरीला नांदू नको म्हणून धमकावत होते. या तणावातूनच नवरीने स्वतःहून सत्य परिस्थिती सांगितली आणि यापूर्वी तिचे आठ ठिकाणी लग्न लावून फसवणूक केल्याचे कबूल केले. पुराव्यादाखल तिने त्या सर्व लग्नांचे फोटोही पाठवले आहेत. या गंभीर फसवणुकीप्रकरणी चकलंबा पोलीस ठाण्यात आणि पोलीस अधीक्षकांकडे तक्रार दाखल करण्यात आली असून, पोलीस या आंतरजिल्हा टोळीचा शोध घेत आहेत.
---------------
हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis