
बीड, 06 मे (हिं.स.)। गेवराई तालुक्यातील चकलांबा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील उमापूर येथून महिनाभरापूर्वी अपहरण करण्यात आलेल्या दोन अल्पवयीन सख्या चुलत बहिणींची उत्तर प्रदेशातील बलिया जिल्ह्यातून सुखरूप सुटका करण्यात बीड पोलिसांना यश आले आहे. पोलीस अधीक्षक नवनीत काँवत यांच्या मार्गदर्शनाखाली चकलांबा पोलिसांनी ही अत्यंत क्लिष्ट आणि धाडसी कारवाई यशस्वीरीत्या पूर्ण केली असून, मुख्य आरोपीला उत्तर प्रदेशातील सिकंदरपूर येथून बेड्या ठोकण्यात आल्या आहेत.
या घटनेची सविस्तर पार्श्वभूमी अशी की, चकलांबा पोलीस स्टेशनच्या हद्दीतील उमापूर येथून आरोपी याने दोन अल्पवयीन सख्या चुलत बहिणींन पळवून नेले होते. या गंभीर घटनेप्रकरणी चकलांबा पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक १०२/२०२६ कलम १३७ (२) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता. अल्पवयीन मुलींच्या अपहरणामुळे हे प्रकरण पोलिसांसाठी मोठे आव्हान बनले होते. तपासाच्या सुरुवातीला आरोपीचे जुने वास्तव्य असलेल्या भिवंडी (जि. ठाणे) येथे पोलिसांनी शोध घेतला, मात्र तिथे आरोपी किंवा मुली मिळून आल्या नाहीत.
तपासाची चक्रे वेगाने फिरवत पोलिसांनी तांत्रिक बाबींची मदत घेतली, ज्यातून या मुली बिहार आणि उत्तर प्रदेशच्या सीमाभागात असल्याचे धागेदोरे हाती लागले. या माहितीच्या आधारे पोलीस अधीक्षकांच्या आदेशानुसार एक विशेष तपास पथक तात्काळ उत्तर प्रदेशला रवाना झाले. उत्तर प्रदेशातील बलिया जिल्ह्यातील शिवपुर दियार आणि त्यानंतर सिकंदरपूर या भागात स्थानिक पोलिसांच्या मदतीने शोधमोहीम राबवण्यात आली. तिथे पोलिसांनी सापळा रचून प्रथम आरोपी याला ताब्यात घेतले आणि त्याच्याकडे केलेल्या कसून चौकशीनंतर दोन्ही अल्पवयीन मुलींना सुखरूप ताब्यात घेण्यात आले.
विशेष म्हणजे आरोपी या मुलींना घेऊन छत्तीसगड राज्यात पळून जाण्याच्या तयारीत होता, मात्र त्याआधीच चकलांबा पोलिसांनी त्याला जेरबंद करून मोठा अनर्थ टाळला. सलग चार दिवसांचा प्रवास करून तपास पथकाने ही कारवाई यशस्वीरीत्या पार पाडली. ही महत्त्वाची कामगिरी पोलीस अधीक्षक नवनीत काँवत, अपर पोलीस अधीक्षक सचिन पांडकर, उपविभागीय पोलीस अधिकारी अनिल कटके यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन इंगळे, पोलीस कर्मचारी कल्याण पवार, हनुमान इंगोले तसेच तांत्रिक विभागाचे पोलीस उपनिरीक्षक शेखर औटे आणि विकी सुरवसे यांनी बजावली आहे. बीड पोलिसांच्या या तत्परतेमुळे दोन निष्पाप मुलींची सुटका झाल्याने सर्वत्र समाधान व्यक्त केले जात आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis