
नवी दिल्ली , 07 मे (हिं.स.)ऑपरेशन सिंदूरच्या पहिल्या वर्धापनदिनानिमित्त भारताने पुन्हा एकदा पाकिस्तानला दहशतवादाच्या मुद्द्यावर कडक संदेश दिला आहे. परराष्ट्र मंत्रालयाने (MEA) स्पष्ट शब्दांत सांगितले की, सीमापार दहशतवाद हा दीर्घकाळापासून पाकिस्तानच्या राज्य धोरणाचा भाग राहिला आहे. भारताने हेही पुन्हा अधोरेखित केले की, दहशतवादाविरोधात स्वतःच्या सुरक्षेसाठी प्रत्युत्तर देणे हा भारताचा अधिकार आहे.
परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांनी गुरुवारी सांगितले की, पहलगाम दहशतवादी हल्ला संपूर्ण जगाने पाहिला आणि समजून घेतला की सीमापार दहशतवादाला कशा प्रकारे प्रोत्साहन दिले जात आहे. त्यांनी म्हटले की, भारताने पाकिस्तान प्रायोजित दहशतवादाला जोरदार प्रत्युत्तर दिले होते आणि भविष्यातही दहशतवादाविरोधातील जागतिक लढा अधिक मजबूत करण्यासाठी प्रयत्न सुरू ठेवले जातील.
एमएफए ने म्हटले की, भारताला आपल्या सुरक्षेसाठी आणि नागरिकांच्या रक्षणासाठी आवश्यक ती सर्व पावले उचलण्याचा पूर्ण अधिकार आहे. निवेदनात म्हटले आहे की, दहशतवादाविरोधातील भारताची भूमिका अत्यंत स्पष्ट असून देश कोणत्याही प्रकारच्या दहशतवादी कारवाया सहन करणार नाही. रणधीर जयस्वाल म्हणाले की, भारत दहशतवादाविरोधातील जागतिक लढा बळकट करण्यासाठी कटिबद्ध आहे. आता जगाला समजले आहे की सीमापार दहशतवाद हा प्रादेशिक शांतता आणि सुरक्षेसाठी किती मोठा धोका बनला आहे. परराष्ट्र मंत्रालयाने पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा उल्लेख करत सांगितले की, त्या घटनेने पुन्हा एकदा पाकिस्तान प्रायोजित दहशतवादाचे वास्तव जगासमोर आणले होते. त्या वेळीही भारताने कठोर कारवाई करत दहशतवादाविरोधातील आपली भूमिका स्पष्ट केली होती.
सिंधू जल करार बाबतही भारताने आपली भूमिका पुन्हा स्पष्ट केली. एमएफए ने सांगितले की, पाकिस्तानकडून सीमापार दहशतवादाला पाठिंबा दिला जात असल्याने हा करार सध्या स्थगित स्थितीत आहे. पाकिस्तानने दहशतवादाला पाठिंबा देणे पूर्णपणे आणि कायमस्वरूपी थांबवले नाही, तोपर्यंत या मुद्द्यावर कोणताही बदल होणार नसल्याचे भारताने स्पष्ट केले.
रणधीर जयस्वाल यांनी एका प्रश्नाच्या उत्तरात सांगितले की, यंदा भारत ब्रिक्स चे अध्यक्षपद भूषवत आहे आणि त्याअंतर्गत परराष्ट्र मंत्र्यांच्या बैठकीसह अनेक महत्त्वाचे कार्यक्रम आयोजित केले जाणार आहेत. बैठकींच्या तारखा आणि इतर औपचारिक तपशील योग्य वेळी जाहीर केले जातील, असे त्यांनी स्पष्ट केले.
---------------
हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode