नंदुरबार - अवकाळी पावसाच्या भीतीने शेतकऱ्यांची धावपळ
नंदुरबार, 07 मे, (हिं.स.) - जिल्ह्यातील तळोदा तालुक्यात अचानक बदललेल्या हवामानामुळे शेतकऱ्यांची मोठी धावपळ सुरू झाली आहे. सावर, कुडले आणि इच्छागव्हाण परिसरात गेल्या दोन दिवसांपासून वातावरणात झालेल्या बदलामुळे अवकाळी पावसाची भीती निर्माण झाली असून,
नंदुरबार - अवकाळी पावसाच्या भीतीने शेतकऱ्यांची धावपळ


नंदुरबार, 07 मे, (हिं.स.) - जिल्ह्यातील तळोदा तालुक्यात अचानक बदललेल्या हवामानामुळे शेतकऱ्यांची मोठी धावपळ सुरू झाली आहे. सावर, कुडले आणि इच्छागव्हाण परिसरात गेल्या दोन दिवसांपासून वातावरणात झालेल्या बदलामुळे अवकाळी पावसाची भीती निर्माण झाली असून, शेतकरी आता तिळ आणि इतर पिकांच्या काढणीत व्यस्त झाले आहेत.

गेल्यावर्षी उन्हाळ्यात मी महिन्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे या भागातील शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले होते. पिकांसह जनावरांच्या चाऱ्याचाही मोठ्या प्रमाणात फटका बसला होता. त्यामुळे यंदाही तशीच परिस्थिती निर्माण होण्याची भीती शेतकऱ्यांमध्ये आहे. याच पार्श्वभूमीवर अनेक शेतकरी सध्या तीळ, हिरवे मूग आणि इतर उन्हाळी पिकांची काढणी करण्यासाठी शेतात दिवसरात्र मेहनत घेताना दिसत आहेत.

विशेषतः तिळ पिकाच्या काढणीला या भागात वेग आला आहे. तीळ हे अत्यंत कमी कालावधीत येणारे महत्त्वाचे तेलबिया पीक मानले जाते. साधारण ८५ ते ९० दिवसांत हे पीक तयार होते. महाराष्ट्रात खरीप आणि उन्हाळी या दोन्ही हंगामात तिळाची लागवड केली जाते. मात्र सध्या उन्हाळी तिळाला बाजारात चांगला दर मिळत असल्याने शेतकऱ्यांचा त्याकडे अधिक कल वाढला आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / मनोहर कांडेकर


 rajesh pande