हापूस आंबा आणि काजू उत्पादकांवर दुहेरी संकट; उत्पादनात ९० टक्क्यांपर्यंत घट
रायगड, 07 मे (हिं.स.) । कोकणातील हापूस आंबा आणि काजू उत्पादक शेतकरी यंदा अभूतपूर्व संकटाचा सामना करत असून उत्पादनात तब्बल 90 टक्क्यांपर्यंत घट झाल्याने शेतकरी आर्थिकदृष्ट्या अडचणीत सापडला आहे. बदलते हवामान, वाढती उष्णता आणि मोहर करपल्यामुळे लाखो
amba


रायगड, 07 मे (हिं.स.) । कोकणातील हापूस आंबा आणि काजू उत्पादक शेतकरी यंदा अभूतपूर्व संकटाचा सामना करत असून उत्पादनात तब्बल 90 टक्क्यांपर्यंत घट झाल्याने शेतकरी आर्थिकदृष्ट्या अडचणीत सापडला आहे. बदलते हवामान, वाढती उष्णता आणि मोहर करपल्यामुळे लाखो रुपयांचा खर्च करूनही अत्यल्प उत्पादन हाती आल्याने शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.

कोकण विभागात यंदा सुमारे 1.75 लाख हेक्टर क्षेत्रावर आंब्याची लागवड करण्यात आली होती. यामध्ये रत्नागिरी जिल्ह्यात 1.20 लाख हेक्टर, सिंधुदुर्ग जिल्ह्यात 38 हजार हेक्टर, तर रायगड जिल्ह्यात 16 हजार हेक्टर क्षेत्राचा समावेश आहे. काजू लागवडही मोठ्या प्रमाणावर करण्यात आली होती. मात्र हवामानातील सततच्या बदलांमुळे 40 टक्क्यांहून अधिक झाडांना मोहरच आला नाही, तर आलेला मोहर उष्णतेमुळे करपून गेला.

पीक वाचवण्यासाठी शेतकऱ्यांनी महागडी औषधे, खतं आणि फवारण्यांवर हेक्टरी दीड लाख रुपयांपर्यंत खर्च केला. मात्र उत्पादन केवळ 10 टक्क्यांवर आल्याने अनेक शेतकरी कर्जबाजारी झाले आहेत.

महाराष्ट्र राज्य आंबा उत्पादक संघाचे अध्यक्ष चंद्रकांत मोकल यांनी शासनाकडे आंब्यासाठी हेक्टरी 5 लाख रुपये आणि काजूसाठी 3 लाख रुपयांच्या मदतीची मागणी केली होती. मात्र शासनाने सर्व पिकांसाठी समान स्वरूपात हेक्टरी 22 हजार 500 रुपयांची मदत जाहीर केली आहे.

“एका हेक्टर बागेसाठी वर्षाला किमान दोन लाख रुपयांचा खर्च येतो. सरकारने जाहीर केलेल्या मदतीत औषधांचाही खर्च निघणार नाही,” अशी संतप्त प्रतिक्रिया श्रीवर्धन तालुक्यातील काजू उत्पादक संजय मोरे यांनी व्यक्त केली.

दरम्यान, आंबा आणि काजू व्यवसायावर अवलंबून असलेल्या मजुरांवरही उपासमारीची वेळ आली आहे. तोडणी, पॅकिंग आणि वाहतूक व्यवसाय ठप्प झाल्याने ग्रामीण अर्थव्यवस्थेवर गंभीर परिणाम होत असल्याची भीती व्यक्त केली जात आहे. शेतकरी संघटनांनी सरकारने तातडीने सन्मानजनक मदत जाहीर करावी, अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही दिला आहे।

-------------------

हिंदुस्थान समाचार / संदेश साळुंके (रायगड)


 rajesh pande