अवकाळी पावसामुळे महाडमध्ये हाहाकार; आंबा व वीट व्यवसायिक अडचणीत
रायगड, 07 मे (हिं.स.)। महाड तालुक्यातील बिरवाडी परिसरात गुरुवारी झालेल्या अवकाळी पाऊस आणि वादळी वाऱ्याने मोठा हाहाकार माजवला. खैराट, सेलटोली, खरवली तसेच जिते-टेमघर गावांमध्ये अनेक घरांवरील पत्रे आणि छप्परे उडून गेल्याने नागरिकांचे मोठे नुकसान झाले
Unseasonal rains wreak havoc in Mahad; Mango and brick businesses in trouble


रायगड, 07 मे (हिं.स.)। महाड तालुक्यातील बिरवाडी परिसरात गुरुवारी झालेल्या अवकाळी पाऊस आणि वादळी वाऱ्याने मोठा हाहाकार माजवला. खैराट, सेलटोली, खरवली तसेच जिते-टेमघर गावांमध्ये अनेक घरांवरील पत्रे आणि छप्परे उडून गेल्याने नागरिकांचे मोठे नुकसान झाले आहे.

दुपारनंतर अचानक आलेल्या जोरदार वाऱ्यासह मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी घरांचे छप्पर उडून गेले. काही घरांमध्ये पावसाचे पाणी शिरल्याने घरातील संसारोपयोगी साहित्याचेही नुकसान झाले. या घटनेमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.

अवकाळी पावसाचा मोठा फटका आंबा उत्पादक आणि वीट व्यवसायिकांनाही बसला आहे. आधीच हवामान बदलामुळे आंबा उत्पादन घटले असताना आता जोरदार पाऊस आणि वाऱ्यामुळे झाडांचे व फळांचे नुकसान झाले आहे. तसेच वीटभट्ट्यांवरील तयार विटा पावसात भिजल्याने व्यावसायिकांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे.

स्थानिक नागरिकांनी प्रशासनाने तातडीने पंचनामे करून नुकसानग्रस्तांना आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी केली आहे. “गोरगरीब शेतकरी आणि नागरिकांचे मोठे नुकसान झाले असून शासनाने तत्काळ मदतीचा हात द्यावा,” अशी भावना नागरिकांनी व्यक्त केली.

दरम्यान, प्रशासनाकडून नुकसानग्रस्त भागांची पाहणी सुरू असून पंचनामे करण्याची प्रक्रिया लवकरच सुरू करण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

---------------

हिंदुस्थान समाचार / संदेश साळुंके (रायगड)


 rajesh pande