

रायगड, 07 मे (हिं.स.)। कर्जत तालुक्यात गुरुवारी झालेल्या अवकाळी पाऊस आणि जोरदार वाऱ्यामुळे नेरळ येथील विद्यामंदिर शाळेच्या इमारतीचे पत्रे उडाल्याची घटना घडली. या घटनेत शाळेचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून सुदैवाने शाळेला सुट्टी असल्यामुळे कोणतीही जीवितहानी किंवा अपघात झाला नाही.
मिळालेल्या माहितीनुसार, दुपारच्या सुमारास कर्जत तालुक्यात अचानक जोरदार वाऱ्यासह अवकाळी पावसाने हजेरी लावली. यावेळी नेरळ येथील विद्यामंदिर शाळेच्या इमारतीवरील काही पत्रे उडून खाली पडली. जोरदार वाऱ्यामुळे परिसरात काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.
घटनेनंतर स्थानिक नागरिक आणि शाळा प्रशासनाने घटनास्थळी धाव घेत पाहणी केली. शाळेच्या परिसरात पत्रे आणि इतर साहित्य विखुरलेले दिसून आले. या घटनेत शाळेच्या छताचे नुकसान झाले असून आर्थिक नुकसानही मोठ्या प्रमाणात झाल्याची प्राथमिक माहिती आहे.
विशेष म्हणजे शाळेला सुट्टी असल्याने विद्यार्थी आणि शिक्षक उपस्थित नव्हते. त्यामुळे मोठी दुर्घटना टळल्याची भावना पालकांकडून व्यक्त करण्यात येत आहे. दरम्यान, अवकाळी पावसामुळे कर्जत तालुक्यात अनेक ठिकाणी झाडे पडणे, वीजपुरवठा खंडित होणे तसेच शेतीचे नुकसान झाल्याच्या घटना समोर येत आहेत. प्रशासनाने नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / संदेश साळुंके (रायगड)