मेळघाटातील आरोग्य व्यवस्थेला दिलासा देण्यासाठी अचलपूर येथे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाची मागणी
अमरावती, 07 मे (हिं.स.)। मेळघाटातील कोलमडलेल्या आरोग्य व्यवस्थेच्या पार्श्वभूमीवर अचलपूर येथे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय स्थापन करण्याची जोरदार मागणी आमदार बच्चू कडू यांनी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री व आरोग्यमंत्र्यांकडे लेखी स्वरूपात केली आहे. दु
मेळघाटातील आरोग्य व्यवस्थेला दिलासा देण्यासाठी अचलपूर येथे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाची मागणी


अमरावती, 07 मे (हिं.स.)।

मेळघाटातील कोलमडलेल्या आरोग्य व्यवस्थेच्या पार्श्वभूमीवर अचलपूर येथे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय स्थापन करण्याची जोरदार मागणी आमदार बच्चू कडू यांनी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री व आरोग्यमंत्र्यांकडे लेखी स्वरूपात केली आहे. दुर्गम भागातील नागरिकांना वेळेत उपचार मिळत नसल्याने होणारे मृत्यू, गर्भवती महिलांचे हाल आणि बालकांच्या जीवावर बेतणारी परिस्थिती लक्षात घेता ही मागणी करण्यात आली आहे.आमदार कडू यांनी निवेदनात नमूद केले की, अमरावती शहरात आधीपासूनच मोठ्या प्रमाणावर वैद्यकीय सुविधा उपलब्ध आहेत. शासकीय व खाजगी वैद्यकीय महाविद्यालये, रुग्णालये आणि हजारो बेडची क्षमता येथे आहे. विविध वैद्यकीय महाविद्यालयांमधून दरवर्षी शेकडो विद्यार्थ्यांना प्रवेश मिळतो, तर शहरातील रुग्णालयांमध्ये हजारो बेडची सुविधा उपलब्ध आहे. त्यामुळे अमरावतीत आरोग्य सेवा मोठ्या प्रमाणावर विकसित झाल्या आहेत.मात्र दुसरीकडे मेळघाट आणि अचलपूर परिसरातील आरोग्य व्यवस्था अत्यंत बिकट असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. अनेक गावांमध्ये डॉक्टर, औषधे आणि रुग्णवाहिका उपलब्ध नाहीत. रुग्णांना १५० ते २०० किलोमीटरचा खडतर प्रवास करून अमरावती गाठावी लागते. या प्रवासादरम्यान अनेक रुग्णांचा मृत्यू होत असल्याच्या घटना घडत आहेत.गर्भवती महिलांना वेळेत उपचार मिळत नाहीत, आजारी बालकांना कडेवर घेऊन डोंगर-दऱ्यांतून प्रवास करावा लागतो, तर वृद्ध रुग्ण उपचाराअभावी घरातच वेदना सहन करत पडून राहतात. कुपोषण, बालमृत्यू आणि मातामृत्यूचे वाढते प्रमाण ही त्या भागातील गंभीर समस्या असल्याचेही त्यांनी नमूद केले.अचलपूर हे भौगोलिकदृष्ट्या चांदूरबाजार, अंजनगाव, दर्यापूर, धारणी व चिखलदरा या भागांसाठी केंद्रबिंदू असल्याने येथे वैद्यकीय महाविद्यालय स्थापन करणे अत्यंत उपयुक्त ठरेल. तसेच येथे मोठ्या प्रमाणात शासकीय जमीन उपलब्ध असून भविष्यात स्वतंत्र जिल्हा म्हणून विकसित होण्याची क्षमता असल्याचेही कडू यांनी सांगितले.सध्या अचलपूर तालुक्यात केवळ १५० ते २०० बेडचीच सुविधा उपलब्ध असून त्याच्या तुलनेत अमरावतीत ३५०० पेक्षा अधिक बेडची सुविधा आहे. त्यामुळे आरोग्य सुविधांचे असमतोल वितरण स्पष्ट दिसून येत असल्याचे त्यांनी नमूद केले.अमरावतीत आधीच मोठ्या प्रमाणावर सुविधा आहेत, मात्र मेळघाटातील लोक आजही उपचारासाठी तडफडत आहेत. अचलपूर येथे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय स्थापन झाल्यास हजारो गरीब व आदिवासी नागरिकांना मोठा दिलासा मिळेल,” असे कडू यांनी म्हटले आहे.दरम्यान, मेळघाट संघर्ष यात्रेदरम्यान महाराष्ट्राचे आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी मेळघाट दौऱ्यात आरोग्य समस्यांचा निपटारा करण्याचे आश्वासन दिले होते. त्या आश्वासनांची पूर्तता होत असल्याचे या मागणीमुळे दिसून येत असल्याची प्रतिक्रिया व्यक्त केली जात आहे.शासनाने या गंभीर व मानवतावादी प्रश्नाकडे तातडीने लक्ष देऊन अमरावती येथे प्रस्तावित शासकीय वैद्यकीय महाविद्यालय अचलपूर येथे स्थानांतरित करण्याचा निर्णय घ्यावा, अशी मागणी करण्यात आली आहे.---------------

हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी


 rajesh pande