होर्मुझ सामुद्रधुनीत १,६०० जहाजे अडकली; ट्रम्प यांचे ‘प्रोजेक्ट फ्रीडम’ ४८ तासांतच ठप्प
वॉशिंग्टन , 07 मे (हिं.स.)।अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी अलीकडेच होर्मुझ सामुद्रधुनीत अडकलेल्या जहाजांच्या ट्रान्झिटसाठी ‘प्रोजेक्ट फ्रीडम’ची सुरुवात केली होती. मात्र, अमेरिकन माध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार, होर्मुझ सामुद्रधुनीत सु
होर्मुझ सामुद्रधुनीत १,६०० जहाजे अडकली; ट्रम्प यांचे ‘प्रोजेक्ट फ्रीडम’ ४८ तासांतच ठप्प


वॉशिंग्टन , 07 मे (हिं.स.)।अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी अलीकडेच होर्मुझ सामुद्रधुनीत अडकलेल्या जहाजांच्या ट्रान्झिटसाठी ‘प्रोजेक्ट फ्रीडम’ची सुरुवात केली होती. मात्र, अमेरिकन माध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार, होर्मुझ सामुद्रधुनीत सुमारे १,६०० जहाजे अद्याप अडकलेली आहेत आणि ट्रम्प यांचा ‘प्रोजेक्ट फ्रीडम’ अवघ्या ४८ तासांतच ठप्प पडला.

अमेरिकन वृत्तवाहिनीच्या अहवालानुसार, सुमारे १,६०० जहाजे अजूनही होर्मुझ सामुद्रधुनीजवळ अडकून पडली आहेत. शिपिंग कंपन्यांसमोर मोठा आर्थिक आणि सुरक्षेचा धोका निर्माण झाला असून, त्या गेल्या दोन महिन्यांहून अधिक काळापासून समुद्री मार्गाने बाहेर पडण्याची संधी शोधत आहेत.

राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी जहाजांना सामुद्रधुनीतून सुरक्षित मार्गदर्शन करण्यासाठी सुरू केलेले अभियान केवळ ४८ तासच चालले. या काळात फक्त दोन जहाजांनाच मार्गदर्शन करण्यात आले. आता पुन्हा शिपिंग कंपन्या स्वतःहून ट्रान्झिटचा धोका पत्करण्यास तयार नाहीत. जहाजांना पुढे जाऊ देणे म्हणजे मालवाहतूक आणि कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेला गंभीर धोका निर्माण होऊ शकतो.

दरम्यान, अलीकडेच दक्षिण कोरियाच्या एका जहाजावर स्फोट झाल्याची माहिती समोर आली होती. याबाबत अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी हा हल्ला इराण कडून करण्यात आल्याचा दावा केला होता.मात्र, आता या प्रकरणावर इराणकडून अधिकृत भूमिका स्पष्ट करण्यात आली आहे.,

दक्षिण कोरियाच्या जहाजावरील हल्ल्यात सहभाग असल्याचा आरोप दक्षिण कोरियातील इराणी दूतावासाने स्पष्टपणे फेटाळून लावला आहे. दक्षिण कोरियातील इराणी दूतावासाने जारी केलेल्या अधिकृत निवेदनात म्हटले आहे की, “होर्मुझ सामुद्रधुनीत कोरियन जहाजाचे नुकसान झालेल्या घटनेत इराणी सैन्याचा सहभाग असल्याचे कोणतेही आरोप आम्ही पूर्णपणे नाकारतो.”निवेदनात पुढे म्हटले आहे की, “अमेरिका आणि इस्रायल सरकारने इराणविरोधात आक्रमक कारवाया सुरू केल्यापासून, होर्मुझ सामुद्रधुनी ही हल्लेखोर शक्ती आणि त्यांच्या समर्थकांविरोधातील सुरक्षेचा महत्त्वाचा भाग असल्याचे इराणने वारंवार स्पष्ट केले आहे.”

इराणी दूतावासाने पुढे म्हटले की, या महत्त्वाच्या जलमार्गातील नौवहनावर बदलत्या सुरक्षा परिस्थितीचा परिणाम झाला आहे. हा परिसर शत्रू शक्ती आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या कारवायांमुळे वाढत्या तणावाला सामोरे जात आहे. त्यामुळे होर्मुझ सामुद्रधुनीतून सुरक्षित प्रवासासाठी लागू असलेल्या नियमांचे काटेकोर पालन करणे, जारी करण्यात आलेल्या इशाऱ्यांकडे लक्ष देणे, निश्चित मार्गांचा वापर करणे आणि इराणच्या संबंधित अधिकाऱ्यांशी समन्वय राखणे आवश्यक आहे.

दक्षिण कोरियातील इराणी दूतावासाने आपल्या निवेदनात पुढे म्हटले, “अशा परिस्थितीत लष्करी आणि सुरक्षाविषयक तणावाने प्रभावित वातावरणातील वास्तव आणि आवश्यक बाबींकडे दुर्लक्ष केल्यास अनपेक्षित घटना घडू शकतात. अशा परिणामांची जबाबदारी त्या पक्षांवर असेल, जे या बाबींकडे दुर्लक्ष करून या भागातून ट्रान्झिट किंवा इतर हालचाली करतात.”

---------------

हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode


 rajesh pande