आम्ही इराण संदर्भातील कोणत्याही परिस्थितीसाठी तयार - बेंजामिन नेतन्याहू
जेरुसलेम , 07 मे (हिं.स.)। इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी त्या बातम्यांचे खंडन केले आहे, ज्यामध्ये असा दावा करण्यात आला होता की इराणबाबत अमेरिकेच्या राजनैतिक पुढाकारामुळे इस्रायल आश्चर्यचकित झाले आहे. नेतन्याहू यांनी स्पष्ट केले की त्
आम्ही इराण संदर्भातील कोणत्याही परिस्थितीसाठी तयार- बेंजामिन नेतन्याहू


जेरुसलेम , 07 मे (हिं.स.)। इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी त्या बातम्यांचे खंडन केले आहे, ज्यामध्ये असा दावा करण्यात आला होता की इराणबाबत अमेरिकेच्या राजनैतिक पुढाकारामुळे इस्रायल आश्चर्यचकित झाले आहे. नेतन्याहू यांनी स्पष्ट केले की त्यांची अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी जवळपास दररोज चर्चा होत असते आणि दोन्ही देशांमध्ये प्रत्येक स्तरावर पूर्ण समन्वय कायम असून इराणच्या मुद्द्यावर त्यांचा देश प्रत्येक परिस्थितीसाठी तयार आहे.

नेतन्याहू म्हणाले की, “आम्ही अमेरिकेतील आमच्या सहकाऱ्यांशी सातत्याने संपर्कात आहोत. मी जवळपास दररोज राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांच्याशी बोलतो. आमच्या आणि त्यांच्या टीममधील चर्चाही दररोज सुरू असतात.” त्यांनी सांगितले की उशिरा रात्री ट्रम्प यांच्यासोबत त्यांची पुन्हा चर्चा होणार आहे.

इस्रायली पंतप्रधानांनी सांगितले की इराणच्या मुद्द्यावर त्यांचा देश प्रत्येक परिस्थितीसाठी तयार आहे. त्यांनी म्हटले की, इस्रायल आणि अमेरिकेचे समान उद्दिष्ट म्हणजे इराणचा संवर्धित अणुसामग्री कार्यक्रम पूर्णपणे संपवणे. अलीकडच्या काही दिवसांत इस्रायली अधिकाऱ्यांनी इराणविरोधात पुन्हा लष्करी कारवाई करण्याच्या शक्यतेलाही पाठिंबा दिला आहे. त्यांच्या मते, इराणची अणुक्षमता आणि बॅलिस्टिक क्षेपणास्त्रांचा साठा अजूनही गंभीर धोका ठरत आहे.

दरम्यान, राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणला नवा अल्टिमेटम देत म्हटले की, जर तेहरानने युद्ध संपवण्यासाठी करार केला नाही, तर त्याला यापूर्वीपेक्षा अधिक तीव्र बॉम्बहल्ल्यांना सामोरे जावे लागेल.मात्र, ट्रम्प यांनी हेही सांगितले की अमेरिका आणि इराण यांच्यातील चर्चेत प्रगती झाली असून लवकरच करार होण्याची शक्यता आहे. व्हाइट हाऊसमध्ये पत्रकारांशी बोलताना ट्रम्प म्हणाले, “आम्हाला करार करायचा आहे. गेल्या २४ तासांत आमची चर्चा अत्यंत सकारात्मक झाली असून कराराची शक्यता अधिक मजबूत झाली आहे.” त्यांनी पुन्हा एकदा ठामपणे सांगितले की, इराणला कोणत्याही परिस्थितीत अण्वस्त्रे मिळवू दिली जाणार नाहीत.

ट्रम्प यांनी दावा केला की संघर्षादरम्यान इराणच्या लष्करी क्षमतेचे मोठे नुकसान झाले आहे. त्यांनी म्हटले की, इराणची नौदल, वायुदल, रडार प्रणाली आणि क्षेपणास्त्र साठ्याचा मोठा भाग नष्ट झाला आहे. ट्रम्प यांनी इतकेही म्हटले की इराणचे अनेक वरिष्ठ लष्करी नेते मारले गेले आहेत आणि या संघर्षात अमेरिका विजयी झाली आहे. तथापि, अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांनी हेही संकेत दिले की राजनैतिक तोडगा अजूनही शक्य आहे. त्यांच्या मते, जर आत्ताच संघर्ष थांबला, तर इराणला आपली लष्करी ताकद पुन्हा उभी करण्यासाठी अनेक दशके लागू शकतात.

---------------

हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode


 rajesh pande