वसंत नाना देशमुख यांचे मतदानही भाजपलाच? जयकुमार गोरे यांच्या वक्तव्याने राजकीय वर्तुळात खळबळ
सोलापूर, 11 जून (हिं.स.)स्थानिक स्वराज्य संस्था विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सोलापूर जिल्ह्यात राजकीय वातावरण चांगलेच तापले असून, पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या एका वक्तव्याने महाविकास आघाडी आणि भाजप या दोन्ही गोटात चर्चांना उधाण आले आहे
Jaykumar gore newss


सोलापूर, 11 जून (हिं.स.)स्थानिक स्वराज्य संस्था विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सोलापूर जिल्ह्यात राजकीय वातावरण चांगलेच तापले असून, पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या एका वक्तव्याने महाविकास आघाडी आणि भाजप या दोन्ही गोटात चर्चांना उधाण आले आहे. महाविकास आघाडीचे उमेदवार वसंत नाना देशमुख यांचे मतदानही भाजपलाच मिळेल, असा राजकीय चिमटा पालकमंत्री गोरे यांनी काढत विरोधकांवर निशाणा साधला.

विधान परिषद निवडणुकीच्या अनुषंगाने पालकमंत्री गोरे यांनी पंढरपूर, सांगोला, मंगळवेढा, अक्कलकोट तसेच सोलापूर शहरातील नगरसेवक व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या सदस्यांच्या भेटी घेत झंजावाती दौरा केला. या दौऱ्यात त्यांनी विविध पदाधिकाऱ्यांशी संवाद साधत भाजप उमेदवार राजेंद्र राऊत यांच्या विजयासाठी जोरदार मोर्चेबांधणी केली.

यावेळी बोलताना गोरे म्हणाले की, वसंत नाना देशमुख यांनी पंचायत समिती सभापती निवडणुकीच्या वेळीच आपली राजकीय भूमिका स्पष्ट केली होती. त्यावेळी त्यांनी प्रत्यक्ष कृतीतून आपण भाजपसोबत असल्याचे दाखवून दिले होते. त्यामुळे या निवडणुकीत त्यांचे मतदान कुठे जाणार याबाबत कोणालाही शंका असण्याचे कारण नाही. पालकमंत्र्यांच्या या वक्तव्यानंतर राजकीय वर्तुळात विविध तर्क-वितर्कांना उधाण आले आहे. महाविकास आघाडीच्या गोटात अस्वस्थता वाढल्याची चर्चा असून, दुसरीकडे भाजप कार्यकर्त्यांमध्ये आत्मविश्वासाचे वातावरण निर्माण झाले आहे.

दरम्यान, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये नेहमीच पडद्यामागील हालचाली, क्रॉस व्होटिंग आणि राजकीय गणिते महत्त्वाची ठरत असतात. त्यामुळे मतदानाच्या दिवसापर्यंत कोण कोणाच्या संपर्कात आहे, कोणाची मते फुटणार आणि कोणाचा राजकीय डाव यशस्वी होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

जिल्ह्यातील राजकीय जाणकारांच्या मते, या निवडणुकीत घोडेबाजार हा शब्द पुन्हा एकदा चर्चेचा विषय बनण्याची शक्यता असून, प्रत्येक मताला सोन्याचे मोल प्राप्त झाले आहे. त्यामुळे मतदानापूर्वी आणि मतदानाच्या दिवशी अनेक अनपेक्षित राजकीय घडामोडी घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. एकूणच, पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या वक्तव्याने निवडणुकीच्या रणधुमाळीत नवा ट्विस्ट निर्माण केला असून, विरोधकांसह सत्ताधारी गोटातील अनेकांच्या कपाळावरही आठ्या उमटल्या आहेत. आता मतदानाच्या दिवशी नेमके कोण कुणाला धक्का देणार आणि कोणाचा राजकीय डाव यशस्वी ठरणार, याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड


 rajesh pande