
भारताकडून अमेरिकेच्या राजदूतांना समन्स
नवी दिल्ली, 11 जून (हिं.स.) - ओमानच्या खाडीत एका व्यावसायिक मालवाहू जहाजावर अमेरिकेने केलेल्या भीषण हल्ल्यात तीन भारतीय नाविकांचा मृत्यू झाला आहे. केंद्रीय नौकानयन मंत्री सर्बानंद सोनोवाल यांनी गुरुवारी या दुर्दैवी घटनेची माहिती दिली. हे तिन्ही नाविक हल्ल्यानंतर सुरुवातीला बेपत्ता झाले होते, मात्र आता त्यांच्या मृत्यूची अधिकृत माहिती समोर आली. या प्राणघातक हल्ल्यामुळे भारत आणि अमेरिकाच्या राजनैतिक संबंधात तीव्र पडसाद उमटले असून भारताने अमेरिकेच्या राजदूतांना बोलवून कडक शब्दांत निषेध नोंदवला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, सेटेबेलो असे अमेरिकन हल्ल्याचा बळी ठरलेल्या या तेल टँकर जहाजाचे नाव होते. या जहाजावर एकूण २८ कर्मचारी होते. यामध्ये २४ भारतीय आणि ४ परदेशी नागरिक (दोन पाकिस्तानी, एक युक्रेनी आणि एक रशियन) यांचा समावेश होता. हल्ल्यात मृत्यू झालेल्या तीन भारतीय नाविकांची ओळख पटली असून त्यांची नावे आदित्य शर्मा (डेक कॅडेट), शिवानंद चौरसिया (इंजिन फिटर), पटनाला सुरेश (चीफ इंजिनिअर) अशी आहेत. या अपघातातून २१ भारतीय कर्मचाऱ्यांना सुखरूप वाचवण्यात यश आले असून त्यांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले आहे. जहाज व्यवस्थापन कंपनीला इतर काही कर्मचाऱ्यांशी संपर्क साधण्यात अडचणी येत आहेत.
अमेरिकन सेंट्रल कमांडच्या लष्कराने दिलेल्या माहितीनुसार, हा तेल टँकर इराणवरील आंतरराष्ट्रीय आर्थिक नाकेबंदीचे उल्लंघन करून तेल घेऊन जात होता. अमेरिकन नौदलाने टँकरला दिलेल्या निर्देशांचे पालन न केल्यामुळे या जहाजावर हल्ला केला. हा अपघात झाला तेव्हा हे जहाज स्ट्रेट ऑफ होर्मुजमधून जात होते.
या घटनेनंतर भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाचे अतिरिक्त सचिव नागराज नायडू यांनी अमेरिकेचे प्रभारी राजदूत जेसन मीक्स यांना तात्काळ समन्स पाठवून या हल्ल्याबाबत तीव्र संताप व विरोध व्यक्त केला.
परराष्ट्र मंत्रालयाने जारी केलेल्या अधिकृत निवेदनात म्हटले आहे की, आम्ही ओमानच्या किनाऱ्याजवळ सेटेबेलो या व्यावसायिक जहाजावर झालेल्या हल्ल्याचा कडक शब्दांत निषेध करतो. या सागरी क्षेत्रात व्यावसायिक जहाजांना आणि नागरी पायाभूत सुविधांना लक्ष्य केले जाणे अत्यंत चिंताजनक असून हे आंतरराष्ट्रीय कायद्यांचे उल्लंघन आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / सुधांशू जोशी