शाळेच्या मान्यतेवर प्रश्नचिन्ह?; आरसीएफच्या पत्राने वाढवली चिंता
रायगड, 11 जून (हिं.स.)। नवीन शैक्षणिक वर्ष सुरू होण्यास अवघे तीन दिवस शिल्लक असताना कुरूळ येथील आरसीएफ शाळेभोवती निर्माण झालेल्या वादाने पालकांमध्ये प्रचंड खळबळ उडाली आहे. आरसीएफ प्रशासनाने पालकांना दिलेल्या पत्रात शाळेची इमारत वापरण्याचा अधिकार डे
Question mark over school's recognition? RCF's letter raises concerns.


रायगड, 11 जून (हिं.स.)। नवीन शैक्षणिक वर्ष सुरू होण्यास अवघे तीन दिवस शिल्लक असताना कुरूळ येथील आरसीएफ शाळेभोवती निर्माण झालेल्या वादाने पालकांमध्ये प्रचंड खळबळ उडाली आहे. आरसीएफ प्रशासनाने पालकांना दिलेल्या पत्रात शाळेची इमारत वापरण्याचा अधिकार डेक्कन एज्युकेशन सोसायटी आणि त्यांच्या कर्मचाऱ्यांना नसल्याचा दावा केल्याने शेकडो विद्यार्थ्यांचे भवितव्य अधांतरी राहिल्याची चर्चा सुरू झाली आहे.

गेल्या काही महिन्यांपासून शाळेच्या व्यवस्थापनाचा प्रश्न प्रलंबित असतानाच प्रवेश प्रक्रिया सुरू असल्याने पालकांनी मोठ्या प्रमाणावर आपल्या पाल्यांचे प्रवेश घेतले आहेत. मात्र अचानक आरसीएफकडून जारी करण्यात आलेल्या पत्रामुळे पालकांमध्ये संभ्रम आणि भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. काही पालकांनी तर तातडीने आपल्या मुलांची नावे काढून इतर शाळांकडे धाव घेतल्याची माहिती समोर आली आहे.

आरसीएफच्या म्हणण्यानुसार, जून २०२४ पासून डेक्कन एज्युकेशन सोसायटीने शाळा चालविण्यास नकार दिला असून शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी हे संस्थेचे कर्मचारी नसल्याचेही स्पष्ट केले आहे. अशा परिस्थितीत कोणत्याही अधिकृत परवानगीशिवाय संस्थेचे नाव वापरून प्रवेश घेतले जात असल्याचा गंभीर आरोप आरसीएफ प्रशासनाने केला आहे.

दुसरीकडे, शिक्षण विभागाने शाळा सुरू राहणार असल्याचे संकेत दिले आहेत. माध्यमिक शिक्षणाधिकारी महारुद्र नाले यांनी संचालक स्तरावरील सुनावणीत शाळा सुरू ठेवण्याचे निर्देश देण्यात आल्याचे सांगितले असून लवकरच अधिकृत पत्र मिळणार असल्याचा दावा केला आहे.

दरम्यान, आरसीएफने उच्च न्यायालयात याचिका दाखल केल्याची माहिती समोर आल्याने हा वाद आणखी गुंतागुंतीचा बनला आहे. शाळा सुरू होण्याच्या तोंडावरच निर्माण झालेल्या या परिस्थितीमुळे शेकडो विद्यार्थी आणि पालक चिंतेत असून आता शिक्षण विभागाच्या अंतिम निर्णयाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

शाळा सुरू होणार की नाही?, प्रवेश वैध आहेत का?, विद्यार्थ्यांचे शैक्षणिक वर्ष धोक्यात येणार का? अशा प्रश्नांनी पालकांमध्ये अस्वस्थता वाढली असून कुरूळ परिसरात या विषयाची जोरदार चर्चा रंगली आहे. शिक्षण विभागाचे पुढील पत्रच आता शेकडो विद्यार्थ्यांच्या भवितव्याचा निर्णय ठरवणार आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / संदेश साळुंके (रायगड)


 rajesh pande