
परभणी, 11 जून (हिं.स.) : परभणी तालुक्यातील मौजे टाकळी (कुं) येथील सन १९९० पासून प्रलंबित असलेली प्लॉट फेरफार प्रकरणे अखेर निकाली काढण्यात आली आहेत. तब्बल ३५ वर्षांपासून रखडलेल्या या प्रकरणांना न्याय मिळाल्याने ग्रामस्थांनी समाधान व्यक्त करत महसूल विभागातील अधिकाऱ्यांचा सत्कार करून कृतज्ञता व्यक्त केली.
ग्रामस्थांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यानंतर जिल्हाधिकारी संजयसिंह चव्हाण यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेत उपविभागीय अधिकारी व तहसीलदारांशी तातडीने चर्चा केली. त्यानंतर प्रलंबित फेरफार प्रकरणे निकाली काढण्याचे आदेश देण्यात आले.
या आदेशानुसार उपविभागीय अधिकारी उदयसिंह भोसले यांनी विशेष बैठक घेऊन ग्रामस्थांचे म्हणणे ऐकून घेतले आणि कार्यवाही सुरू केली. तहसीलदार संदीप राजपुरे, नायब तहसीलदार मधुकर क्षीरसागर, ग्राम महसूल अधिकारी सोपान गुट्टे आणि मंडळ अधिकारी ज्योती अडागळे यांच्या समन्वयातून सर्व प्रलंबित फेरफार प्रकरणांचा निपटारा करण्यात आला.
या पार्श्वभूमीवर टाकळी (कुं) येथील ग्रामस्थांच्या वतीने महसूल अधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला. या प्रसंगी सरपंच मुंजाजी माणिकराव पारदे, माजी जिल्हा परिषद सदस्य तुळशीराम मंचकराव सामाले, गोविंद देशमुख, नारायण राऊत, परमेश्वर बोराडे, बालाजी निवाळे, गंगाधर गडवे, व्यंकटी देशमुख यांच्यासह मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते.ग्रामस्थांनी सांगितले की, गेल्या ३५ वर्षांपासून या फेरफार प्रकरणांसाठी संघर्ष सुरू होता. अखेर महसूल प्रशासनाच्या पुढाकारामुळे दीर्घकालीन प्रश्न सुटून ग्रामस्थांना मोठा दिलासा मिळाला आहे.
--------------------
हिंदुस्थान समाचार / Chaitanya JayantRao Chitnis