
रायगड, 11 जून (हिं.स.)। : श्रीवर्धन शहराच्या पाणीपुरवठ्यासाठी महत्त्वाच्या असलेल्या रानवली धरणातील गाळ उपसा कामावरून वाद निर्माण झाला असून या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करण्याची मागणी जोर धरू लागली आहे. श्रीवर्धन नगरपरिषदेचे विरोधी पक्षनेते तथा नगरसेवक संतोष (पिंट्या) वेश्विकर यांनी प्रशासनावर गंभीर प्रश्न उपस्थित करत या प्रकरणात पारदर्शक चौकशीची मागणी केली आहे.
गाळ उपशाच्या नावाखाली धरण परिसरातील नैसर्गिक टेकड्या तोडून मोठ्या प्रमाणावर मातीचे उत्खनन करण्यात आल्याचा आरोप स्थानिक नागरिकांकडून केला जात आहे. ही माती विविध बिल्डर्स आणि व्यावसायिकांना भरावासाठी पुरविण्यात आल्याचा दावाही करण्यात येत आहे. त्यामुळे प्रत्यक्षात गाळ उपसा झाला की मातीचे व्यावसायिक उत्खनन करण्यात आले, याबाबत प्रश्न निर्माण झाले आहेत.
या संदर्भात लघु पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता त्यांनी चौकशीचा विषय जलसंपदा विभागाशी संबंधित असल्याचे सांगितल्याचा आरोप वेश्विकर यांनी केला. प्रशासनाकडून स्पष्ट माहिती मिळत नसल्याने नागरिकांमध्ये नाराजी वाढत आहे. या प्रकरणाची वस्तुस्थिती समोर आणण्यासाठी पाटबंधारे विभाग, महसूल विभाग, स्थानिक नागरिक, पत्रकार आणि सामाजिक कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत संयुक्त पाहणी करण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली आहे. काही नागरिकांनी या प्रकरणाशी संबंधित छायाचित्रे व व्हिडिओ पुरावे सादर करण्याची तयारीही दर्शवली आहे.
धरण परिसरातील टेकड्या आणि नैसर्गिक भूभाग जलसाठा टिकवून ठेवण्यासाठी महत्त्वाचे मानले जातात. त्यामुळे या भागातील भूभागाशी छेडछाड झाल्यास भविष्यात शहराच्या पाणीपुरवठ्यावर परिणाम होण्याची तसेच पर्यावरणीय समतोल बिघडण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
श्रीवर्धनकरांच्या हक्काच्या पाण्याशी आणि पर्यावरणाशी खेळ खपवून घेतला जाणार नाही. या प्रकरणाची तातडीने निष्पक्ष चौकशी झाली नाही तर लोकशाही मार्गाने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा नगरसेवक संतोष वेश्विकर यांनी दिला आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / संदेश साळुंके (रायगड)