“अनावश्यक हस्तक्षेप करणाऱ्यांचा नीट विचार होईल” : सुनेत्रा पवार
राष्ट्रवादी काँग्रेसच्या वर्धापन दिनी दिला सूचक इशारा मुंबई, 11 जून (हिं.स.) : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या हिताला सर्वोच्च प्राधान्य दिले जाईल. जर पक्षाच्या कारभारात कुणाचा अनावश्यक हस्तक्षेप होत असेल तर त्याचा नीट विचार होईल असा सूचक इशारा उपम
सुनेत्रा पवार एनसीपी कार्यकर्ताओ को संबोधित करते हुए (फाईल फोटो)


राष्ट्रवादी काँग्रेसच्या वर्धापन दिनी दिला सूचक इशारा

मुंबई, 11 जून (हिं.स.) : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या हिताला सर्वोच्च प्राधान्य दिले जाईल. जर पक्षाच्या कारभारात कुणाचा अनावश्यक हस्तक्षेप होत असेल तर त्याचा नीट विचार होईल असा सूचक इशारा उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी दिला. राष्ट्रवादी काँग्रेसच्या 27 व्या वर्धापन दिनानिमित्त आज, गुरुवारी मुंबई आयोजित कार्यक्रमात त्यांनी उपरोक्त भाष्य केले.

कार्यक्रमादरम्यान त्या भावनिक झाल्याचे दिसून आले. पक्षात योग्यवेळी प्रत्येकाला न्याय आणि संधी मिळेल याची मी खात्री देते. आतापर्यंत पक्षात जे घडले, ते मी समजून घेतले आणि सावरले आहे, असे त्या म्हणाल्या. अजित पवार यांनी त्यांच्या कार्यकाळात सर्व कार्यकर्त्यांना समजून घेतले, सर्वांचे प्रश्न सोडवले आणि पक्षाला मजबूत करण्यासाठी प्रयत्न केले. यापुढे मी पक्षाच्या हिताला सर्वोच्च प्राधान्य देईल. कुणाचाही अनावश्यक हस्तक्षेप असेल तर त्याचा निश्चित विचार केला जाईल, असा पुनरुच्चार त्यांनी केला. पक्षहितासाठी कठोर निर्णय घ्यावे लागले तरी ते स्वीकारण्याची तयारी असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

न्याय देण्यासाठी मी अजितदादांच्या पावलावर पाऊल ठेवून पुढे जाण्याचा प्रयत्न करेन असे त्या म्हणाल्या. कार्यक्रमात त्यांनी कार्यकर्त्यांना एकत्र राहण्याचे आवाहन करत पक्ष कुटुंबासारखा असल्याचा विश्वास व्यक्त केला. शिव, शाहू, फुले, आंबेडकर यांची विचारधारा पुढे नेणे म्हणजे सर्वांना बरोबर घेऊन जाणे आहे. स्वातंत्र्य लढा आणि संयुक्त महाराष्ट्र आंदोलनात सर्व घटकांचे योगदान महत्त्वाचे राहिल्याचे सुनेत्रा पवार म्हणाल्या.यंदाच्या पक्षाच्या वर्धापन दिनाची थीम “समर्पण, संघर्ष आणि संकल्प” असून ती अजित पवार यांना समर्पित करण्यात आल्याचे त्यांनी स्पष्ट केले. अजित पवार यांनी पक्षासाठी स्वतःला पूर्णपणे समर्पित केल्याचेही त्यांनी सांगितले.

कार्यकर्त्यांच्या योगदानाचा उल्लेख करत त्या म्हणाल्या की, राष्ट्रवादी काँग्रेसच्या जडणघडणीत शेकडो कार्यकर्त्यांचा मोलाचा वाटा आहे. अजित पवार यांनी शेतकरी, युवक, महिला, उद्योजक आणि वंचित घटकांसाठी सातत्याने काम केल्याचे त्यांनी सांगितले. तसेच अजित पवारांची जागा कोणीही घेऊ शकत नाही. मात्र, त्यांनी दाखवलेला विकासाचा मार्ग आणि सर्वसामान्यांशी असलेली बांधिलकी हीच पक्षाची खरी ताकद असल्याचे त्यांनी अधोरेखित केले. अजित पवार यांचा संकल्प पक्ष बळकट करणे आणि लोकहिताचे काम पुढे नेणे हाच होता. मर्यादित कालावधी असूनही अजित पवार यांनी पक्षाला राष्ट्रीय स्तरावर ओळख मिळवून दिली आणि सर्वसामान्यांमध्ये “आपला माणूस” अशी प्रतिमा निर्माण केल्याचे देखील त्यांनी यावेळी सांगितले.

----------------------------

हिंदुस्थान समाचार / मनीष कुलकर्णी


 rajesh pande