वाळू माफियांवर कारवाई, ४ डंपर जप्त
जळगाव, 11 जून (हिं.स.)अवैध गौण खनिज उत्खनन आणि वाळू वाहतुकीविरोधात पाचोरा तहसील प्रशासनाने पुन्हा एकदा मोठी धडक कारवाई करत चार डंपर जप्त केले आहेत. उपविभागीय अधिकारी भूषण अहिरे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि तहसीलदार विजय बनसोडे यांच्या नियोजनानुसार र
वाळू माफियांवर कारवाई, ४ डंपर जप्त


जळगाव, 11 जून (हिं.स.)अवैध गौण खनिज उत्खनन आणि वाळू वाहतुकीविरोधात पाचोरा तहसील प्रशासनाने पुन्हा एकदा मोठी धडक कारवाई करत चार डंपर जप्त केले आहेत. उपविभागीय अधिकारी भूषण अहिरे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि तहसीलदार विजय बनसोडे यांच्या नियोजनानुसार रात्री विशेष टास्क फोर्सने मौजे डोकलखेडा परिसरातून अवैध वाळूची वाहतूक करणारे जळगाव येथील चार डंपर ताब्यात घेतले. या कारवाईमुळे वाळू माफियांचे धाबे दणाणले असून परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.ही मोहीम अत्यंत गोपनीयता आणि नियोजनबद्ध पद्धतीने राबवण्यात आली. महसूल व पोलीस प्रशासनाच्या २३ सदस्यांच्या संयुक्त पथकाने समन्वयाने काम करत संबंधित डंपर ताब्यात घेतले आणि ते पाचोरा तहसील कार्यालयात जमा केले. पाचोरा प्रशासनाकडून सातत्याने होत असलेल्या कारवायांमुळे तहसील कार्यालय परिसर आणि शासकीय रुग्णालयालगतचे कंपाउंड जप्त वाहनांनी अक्षरशः भरून गेले आहे. या विशेष मोहिमेत टास्क फोर्स क्रमांक १ व २ च्या पथकांनी महत्त्वाची भूमिका बजावली. मंडळ अधिकारी आर. डी. पाटील यांच्या नेतृत्वाखाली राहुल पवार, नकुल काळकर, राजेंद्र शिरसाठ, अविनाश जंजाळे, दीपक दवंगे, शिवाजी डोंगरे यांच्यासह इतर महसूल कर्मचाऱ्यांनी ही कारवाई यशस्वी केली. तसेच, पोलीस विभागाचे ब. दु. सिंग बंजारा, हेड कॉन्स्टेबल गजानन देशमुख व अशोक पाटील यांचेही मोलाचे सहकार्य लाभले. अवैध वाळू उपशामुळे शासनाच्या महसुलाचे मोठे नुकसान होत होते, त्याला या कारवाईमुळे चाप बसला आहे. नैसर्गिक संपत्तीचे संवर्धन आणि शासकीय महसुलाचे संरक्षण करण्यासाठी प्रशासन कटिबद्ध असून, भविष्यातही अशा कठोर कारवाया सुरूच राहतील, असा स्पष्ट इशारा तहसीलदार विजय बनसोडे यांनी दिला आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / मनोहर कांडेकर


 rajesh pande