फिफा विश्वचषकात भारतीय वंशाचे फुटबॉलपटू चमक दाखवण्यास सज्ज
नवी दिल्ली, 11 जून (हिं.स.) भारतीय फुटबॉल चाहते अनेक वर्षांपासून आपल्या राष्ट्रीय संघाने विश्वचषकात खेळावे असे स्वप्न पाहत आहेत. त्यांचे हे स्वप्न कधी पूर्ण होईल हे सांगता येत नसले तरी, भारतीय फुटबॉल चाहत्यांसाठी ते आता सत्यात उतरणार आहे. भारतीय वं
फिफा विश्वचृषक ट्रॉफी


नवी दिल्ली, 11 जून (हिं.स.) भारतीय फुटबॉल चाहते अनेक वर्षांपासून आपल्या राष्ट्रीय संघाने विश्वचषकात खेळावे असे स्वप्न पाहत आहेत. त्यांचे हे स्वप्न कधी पूर्ण होईल हे सांगता येत नसले तरी, भारतीय फुटबॉल चाहत्यांसाठी ते आता सत्यात उतरणार आहे. भारतीय वंशाचे चार फुटबॉलपटू फिफा विश्वचषक २०२६ मध्ये आपले कौशल्य दाखवण्यासाठी सज्ज झाले आहेत. हे चार फुटबॉलपटू आपापल्या देशांसाठी म्हणजेच न्यूझीलंड, ऑस्ट्रेलिया, कतार आणि डीआर काँगो—खेळतील. पण त्याचबरोबर ते आपला भारतीय वारसाही दाखवतील. हे चार फुटबॉलपटू आहेत सरप्रीत सिंग, सॅम्युअल मौतुसामी, निशान वेलुपिल्लई आणि तहसीन मोहम्मद.

सरप्रीत सिंग

सरप्रीत सिंग हा न्यूझीलंडमधील ऑकलंड येथे जन्मलेला २७ वर्षीय आक्रमक मिडफिल्डर आहे. त्याचे पालक पंजाबी वंशाचे आहेत आणि भारतीय संस्कृतीशी त्याचे घनिष्ठ नाते आहे. २०१० नंतर प्रथमच न्यूझीलंड फुटबॉल संघाला विश्वचषकात पोहोचण्यास मदत करण्यात सरप्रीतने महत्त्वाची भूमिका बजावली. आजपर्यंत, त्याने न्यूझीलंडसाठी २६ सामन्यांमध्ये तीन गोल केले आहेत आणि सात असिस्ट्स दिले आहेत. सरप्रीत जर्मन क्लब एफसी बायर्न म्युनिककडूनही खेळला आहे. त्याने अनेकदा सांगितले आहे की तो मनाने भारतीय आहे आणि पंजाबी संस्कृतीचा स्वीकार करतो. क्रिकेटमध्ये, तो विराट कोहली आणि सचिन तेंडुलकरचा मोठा चाहता आहे.

तहसीन मोहम्मद

तहसीन मोहम्मद हा १९ वर्षीय अटॅकिंग मिडफिल्डर आहे. त्याचे आई-वडील मूळचे केरळचे आहेत. त्याचे वडील, जमशीद, थलासेरीचे असून, त्याची आई, शायमा, वलपट्टणमची आहे. तहसीन हा कतार स्टार्स लीगमध्ये खेळणारा पहिला भारतीय वंशाचा फुटबॉलपटू मानला जातो. त्याने कतारच्या वरिष्ठ संघासाठी दोन सामने खेळले आहेत, ज्यात जून २०२४ मध्ये अफगाणिस्तानविरुद्ध झालेल्या फिफा विश्वचषक पात्रता सामन्याचा समावेश आहे. लहान वयातच त्याने आपल्या प्रतिभेने फुटबॉल जगताचे लक्ष वेधून घेतले आहे आणि तो आगामी विश्वचषकात कतारसाठी एक महत्त्वाचा फुटबॉलपटू ठरू शकतो.

निशान वेलुपिल्लई

निशान वेलुपिल्लईची आई अँग्लो-इंडियन आहे आणि त्याचे वडील श्रीलंकन वंशाचे तमिळ आहेत. २५ वर्षीय वेलुपिल्लई मेलबर्न व्हिक्टरी संघाकडून खेळतो. त्याचा जन्म आणि संगोपन मेलबर्नमध्येच झाले. फिफा विश्वचषक स्पर्धेत पदार्पण करणाऱ्या २६ सदस्यीय संघातील १७ फुटबॉलपटूंपैकी निशान एक आहे. त्याने ऑक्टोबर २०२४ मध्ये विश्वचषक पात्रता फेरीदरम्यान ऑस्ट्रेलियासाठी पदार्पण केले. तेव्हापासून, त्याने ऑस्ट्रेलियासाठी सात सामने खेळले असून, विश्वचषक पात्रता फेरीतच तीन गोल केले आहेत.

सॅम्युअल मौतुसामी

सॅम्युअल मौतुसामीचा फिफा विश्वचषक २०२६ साठी डीआर काँगोच्या राष्ट्रीय फुटबॉल संघात समावेश करण्यात आला आहे. हा २९ वर्षीय मिडफिल्डर फ्रान्समधील पॅरिस येथे जन्मला. त्याची आई काँगोची असून वडील तमिळ वंशाचे आहेत. फिफा विश्वचषक २०२६ मध्ये सहभागी होणारा तो भारतीय वंशाचा चौथा फुटबॉलपटू ठरला आहे. मूळचा भारतातील तमिळनाडूचा असलेला सॅम्युअल, काँगोच्या राष्ट्रीय संघासाठी एक महत्त्वाचा सेंट्रल मिडफिल्डर म्हणून खेळतो. त्याने आतापर्यंत काँगोच्या वरिष्ठ राष्ट्रीय संघासाठी ५७ सामने खेळले आहेत.

फिफाच्या नियमांनुसार, एखादा फुटबॉलपटू राष्ट्रीय संघासाठी तेव्हाच खेळू शकतो, जेव्हा त्याचे आई-वडील किंवा आजी-आजोबांपैकी एकाचा जन्म त्या देशात झाला असेल आणि फुटबॉलपटूकडे तो ज्या देशाचे प्रतिनिधित्व करतो त्या देशाचा पासपोर्ट असणे आवश्यक आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / वृषाली देशपांडे


 rajesh pande