
नवी दिल्ली, 11 जून, (हिं.स.)ऑस्ट्रेलियाने बांगलादेशविरुद्धच्या आगामी टी-२० मालिकेसाठी नवोदित भारतीय वंशाचा फिरकी गोलंदाज निखिल चौधरी याची निवड केली आहे. निखिलने ऑस्ट्रेलियासाठी आंतरराष्ट्रीय पदार्पण केलेले नाही, पण तो बिग बॅश टी-२० स्पर्धेत होबार्ट हरिकेन्सकडून खेळला आहे. तो आयपीएलमध्ये दिल्ली कॅपिटल्स संघाचाही भाग होता. विशेष म्हणजे, निखिलने पंजाबकडून देशांतर्गत पदार्पण केले होते, पण आता तो ऑस्ट्रेलियन जर्सीमध्ये दिसणार आहे.
दिल्लीत जन्मलेला आणि नंतर ऑस्ट्रेलियात स्थायिक झालेला निखिल, जर १७ जूनपासून चट्टोग्राममध्ये सुरू होणाऱ्या तीन सामन्यांच्या मालिकेसाठी अंतिम ११ क्रिकेटपटूंमध्ये निवडला गेला, तर तो ६० वर्षांहून अधिक काळात आंतरराष्ट्रीय स्तरावर खेळणारा पहिला भारतीय वंशाचा ऑस्ट्रेलियन पुरुष क्रिकेटपटू ठरू शकतो. स्फोटक फलंदाज ट्रॅव्हिस हेडच्या जागी निखिलची निवड करण्यात आली आहे आणि ऑस्ट्रेलियन निवडकर्ता टोनी डोडमाइड यांना विश्वास आहे की हा गोलंदाजी अष्टपैलू खेळाडू चांगली कामगिरी करेल.
निखिलने २०१७ ते २०१९ दरम्यान पंजाबसाठी १४ देशांतर्गत सामने खेळले, ज्यात १२ टी-२० सामन्यांचा समावेश आहे. त्याने आंतर-राज्य टी२० स्पर्धा आणि सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीमध्येही सहभाग घेतला होता. निखिलने विजय हजारे ट्रॉफीमध्ये दोन लिस्ट ए सामनेही खेळले आहेत.निखिल हरभजन सिंगच्या नेतृत्वाखाली अशा संघात खेळला, ज्यात युवराज सिंग आणि शुभमन गिलसारखे भारतीय स्टार क्रिकेटपटू होते.
निखिल २०२० मध्ये क्वीन्सलँडमधील आपल्या काकांना भेटण्यासाठी ऑस्ट्रेलियाला गेला होता. पण कोविड-१९ महामारीमुळे ऑस्ट्रेलियाने आपल्या आंतरराष्ट्रीय सीमा बंद केल्या. निखिल तिथेच राहिला आणि सध्या त्याच्याकडे २०२७ पर्यंत वैध असलेला तात्पुरता व्हिसा आहे. त्याच्याकडे अद्याप कायमस्वरूपी रहिवासी दर्जा किंवा नागरिकत्व नाही. पण पाच वर्षे ऑस्ट्रेलियात राहिल्यामुळे, नागरिक नसतानाही तो आयसीसीच्या नियमांनुसार राष्ट्रीय संघाकडून खेळण्यास पात्र ठरतो.
---------------
हिंदुस्थान समाचार / वृषाली देशपांडे