
लातूर, 13 जून (हिं.स.) : महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तकनिर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळ (बालभारती), पुणे यांच्या नवीन अभ्यासक्रमात इयत्ता तिसरीच्या इंग्रजी माध्यमाच्या पाठ्यपुस्तकात लातूरमधील कवी रसूल पठाण यांची ‘नदी माय’ ही कविता समाविष्ट करण्यात आली आहे.
‘निसर्गाशी जुळवू नाते’ या बालकविता संग्रहातील ही कविता आता राज्यभरातील लाखो तिसरीच्या विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी उपलब्ध होणार आहे. साध्या-सोप्या शब्दांत निसर्गाचे सौंदर्य आणि ग्रामीण जीवनाचे चित्रण करणाऱ्या रसूल पठाण यांच्या कवितांना विशेष ओळख मिळाली आहे.
रसूल पठाण हे एकुर्का रोड येथील समर्थ माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात कार्यरत असून साहित्य, सामाजिक, शैक्षणिक आणि सांस्कृतिक क्षेत्रात त्यांचे योगदान उल्लेखनीय मानले जाते. बालसाहित्य क्षेत्रात ग्रामीण भावविश्व मांडणारे कवी म्हणून ते ओळखले जातात.
त्यांच्या कवितेचा पाठ्यपुस्तकात समावेश झाल्याबद्दल विविध राजकीय, शैक्षणिक आणि साहित्य क्षेत्रातील मान्यवरांनी त्यांचे अभिनंदन केले आहे. यामध्ये माजी मंत्री आमदार संजय बनसोडे, म. ए. सोसायटीचे अध्यक्ष बसवराज पाटील नागराळकर, रामचंद्र तिरूके, राहुल केंद्रे, तसेच अनेक साहित्यिक, पत्रकार आणि शिक्षण क्षेत्रातील मान्यवरांचा समावेश आहे.
या निवडीमुळे लातूरच्या साहित्यिक क्षेत्राला मोठी ओळख मिळाल्याची भावना व्यक्त केली जात आहे.
-----------------------------
हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis