
परभणी, 13 जून (हिं.स.)।
एनडीपीएस प्रकरणातील फरार आरोपीला परभणी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने जिंतूर शहरातून अटक केली. गुप्त माहितीच्या आधारे मध्यरात्री करण्यात आलेल्या या कारवाईमुळे पोलिसांना महत्त्वाचे यश मिळाले आहे.पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, स्थानिक गुन्हे शाखेचे पथक जिंतूर शहर व परिसरात गस्त घालत होते. यावेळी जिंतूर पोलीस ठाण्यात दाखल गुन्हा क्रमांक २७६/२०२६ मधील फरार आरोपी अभिजीत उर्फ बिल्ली सुभाष राठोड (वय ३०, रा. गणपती गल्ली, जिंतूर) हा त्याच्या राहत्या घरी आल्याची माहिती गुप्त बातमीदारामार्फत पोलिसांना मिळाली. माहितीची खातरजमा केल्यानंतर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने गणपती गल्ली परिसरात धाव घेतली. आरोपीला संशय येऊ न देता परिसरात सापळा रचण्यात आला. त्यानंतर पोलिसांनी शिताफीने कारवाई करून आरोपीला ताब्यात घेतले. अटक करण्यात आलेला आरोपी एनडीपीएस कायदा १९८५ अंतर्गत कलम २०(ब), २(ब) व २२ अन्वये दाखल गुन्ह्यात फरार होता.आरोपीला पुढील तपास व कायदेशीर कार्यवाहीसाठी जिंतूर पोलीस ठाण्याच्या स्वाधीन करण्यात आले आहे. पोलीस अधीक्षक पंकज कुमावत यांच्या आदेशानुसार व स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक गजेंद्र सरोदे यांच्या मार्गदर्शनात ही कारवाई करण्यात आली.
---------------
हिंदुस्थान समाचार / Chaitanya JayantRao Chitnis