क्राइस्ट युनिव्हर्सिटीच्या पदवीदान समारंभात ४९२ विद्यार्थ्यांची यशस्वी झेप
विनायक पै व संजीव रस्तोगी यांच्या हस्ते पदवीधरांचा गौरव
492 students successfully graduated from Christ University's graduation ceremony


492 students successfully graduated from Christ University's graduation ceremony


रायगड, 13 जून (हिं.स.)। : क्राइस्ट युनिव्हर्सिटी, लवासा कॅम्पस येथे २०२६ च्या पदवीधर विद्यार्थ्यांसाठी वार्षिक पदवीदान समारंभ मोठ्या उत्साहात आणि दिमाखदार वातावरणात पार पडला. विविध शैक्षणिक शाखांमधून यशस्वीरित्या शिक्षण पूर्ण केलेल्या ४९२ विद्यार्थ्यांना यावेळी पदवी प्रदान करण्यात आली. कायदा, व्यवसाय प्रशासन, वाणिज्य, इंग्रजी व सांस्कृतिक अभ्यास तसेच माहिती विज्ञान या शाखांतील विद्यार्थ्यांसाठी हा क्षण अत्यंत अभिमानास्पद आणि संस्मरणीय ठरला.

या सोहळ्यास उद्योग क्षेत्रातील मान्यवर व्यक्ती, विद्यापीठाचे वरिष्ठ अधिकारी, विभागप्रमुख, प्राध्यापक, पालक आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून टाटा प्रोजेक्ट्स लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक व मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. विनायक पै तसेच अदानी कॉर्पोरेट हाऊसचे मुख्य कार्यकारी अधिकारी (जीसीसी) श्री. संजीव रस्तोगी उपस्थित होते. त्यांनी विद्यार्थ्यांना आत्मविश्वास, प्रामाणिकपणा आणि सेवाभाव जपत व्यावसायिक जीवनात यशस्वी वाटचाल करण्याचा संदेश दिला.

समारंभाचे अध्यक्षस्थान विद्यापीठाचे कुलपती डॉ. फादर साजू चाकलाकल (CMI) आणि कुलगुरू डॉ. फादर जोसेफ सी. सी. यांनी भूषविले. यावेळी कुलसचिव डॉ. अनिल जोसेफ पिंटो, शैक्षणिक कुलसचिव डॉ. ज्योती कुमार आणि परीक्षा नियंत्रक डॉ. विजयशंकर ए. व्ही. उपस्थित होते. पुणे लवासा कॅम्पसचे संचालक डॉ. फादर लिजो थॉमस आणि सहयोगी संचालक डॉ. एस. परमेश्वरन यांनीही विद्यार्थ्यांचे अभिनंदन करत त्यांना उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या.

आपल्या भाषणात कुलगुरू डॉ. फादर जोसेफ सी. सी. यांनी बदलत्या रोजगार क्षेत्रातील आव्हानांचा उल्लेख करत विद्यार्थ्यांना सतत नवीन कौशल्ये आत्मसात करण्याचे आवाहन केले. तर कुलपती डॉ. फादर साजू चाकलाकल यांनी सहकार्य, नवोपक्रम आणि सामाजिक जबाबदारी यांचे महत्त्व अधोरेखित केले. संचालक डॉ. फादर लिजो थॉमस यांनी विद्यार्थ्यांच्या वैयक्तिक विकासाचा गौरव करत समाजात सकारात्मक परिवर्तन घडवून आणण्याची क्षमता त्यांच्यात असल्याचा विश्वास व्यक्त केला.उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झालेल्या या पदवीदान समारंभाने विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रवासाचा महत्त्वपूर्ण टप्पा गाठला असून त्यांच्या नव्या वाटचालीला प्रेरणादायी सुरुवात मिळाली.

---------------

हिंदुस्थान समाचार / संदेश साळुंके (रायगड)


 rajesh pande