
लातूर, 13 जून (हिं.स.) : महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात येणारी ‘महाराष्ट्र गट-ब (अराजपत्रित) सेवा संयुक्त पूर्व परीक्षा-२०२६’ रविवारी, 14 जून 2026 रोजी लातूर जिल्ह्यात उत्साहात पार पडणार आहे. या परीक्षेसाठी प्रशासनाने कडक सुरक्षा व्यवस्था तैनात केली असून ३२ परीक्षा उपकेंद्रांच्या परिसरात प्रतिबंधात्मक आदेश लागू करण्यात आले आहेत.
परीक्षा पारदर्शक आणि सुरळीत वातावरणात पार पडावी यासाठी जिल्हाधिकारी डॉ. भारत बास्टेवाड यांनी भारतीय नागरी सुरक्षा संहिता २०२३ चे कलम १६३ लागू केले आहे. हे आदेश 14 जून रोजी सकाळी 8 ते दुपारी 2 या वेळेत सर्व परीक्षा केंद्रांच्या 100 मीटर परिसरात लागू राहणार आहेत.
निर्बंधांनुसार परीक्षा केंद्र परिसरात पाच किंवा त्यापेक्षा जास्त व्यक्तींना एकत्र येण्यास मनाई करण्यात आली आहे. तसेच झेरॉक्स सेंटर, टायपिंग सेंटर, पानटपरी, एसटीडी बूथ आणि ध्वनिक्षेपकांचा वापर परीक्षा कालावधीत बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
परीक्षा केंद्र परिसरात मोबाईल फोन आणि कोणत्याही इलेक्ट्रॉनिक प्रसार माध्यमांना बंदी घालण्यात आली असून अनधिकृत व्यक्ती किंवा वाहनांना प्रवेश दिला जाणार नाही.
ही परीक्षा सकाळी 11 ते दुपारी 12 या वेळेत होणार आहे. परीक्षेसाठी नियुक्त अधिकारी, कर्मचारी आणि पोलीस प्रशासन यांना मात्र या निर्बंधांमधून सूट देण्यात आली आहे.जिल्हा प्रशासनाने सर्व तयारी पूर्ण झाल्याचे सांगत उमेदवारांनी वेळेत परीक्षा केंद्रावर उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे.
-------------------------
हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis