जसपाल राणा यांनी क्रीडा विश्वाला नवी दिशा दिली : संघ
नागपूर, 13 जून (हि.स.) : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने प्रख्यात नेमबाज जसपाल राणा यांच्या निधनाबद्दल तीव्र शोक व्यक्त केला आहे. संघाने म्हटले आहे की, त्यांनी क्रीडाक्षेत्राच्या माध्यमातून आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताचा गौरव वाढवला आणि देशाच्या क्रीडा व
दिवंगत जसपाल राणांचा संग्रहित फोटो


नागपूर, 13 जून (हि.स.) : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने प्रख्यात नेमबाज जसपाल राणा यांच्या निधनाबद्दल तीव्र शोक व्यक्त केला आहे. संघाने म्हटले आहे की, त्यांनी क्रीडाक्षेत्राच्या माध्यमातून आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताचा गौरव वाढवला आणि देशाच्या क्रीडा विश्वाला नवी दिशा दिली होती.

जसपाल राणा यांचे शुक्रवारी दिल्लीतील एका रुग्णालयात निधन झाले. मृत्यूसमयी ते 49 वर्षांचे होते. म्युनिक येथे आयोजित आयएसएसएफ विश्वचषक स्पर्धेतून परतत असताना त्यांची प्रकृती खालावली होती. त्यानंतर त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते, जिथे त्यांची प्राणज्योत मालवली. राणांच्या निधनाबद्दल संघाने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म 'एक्स'वर दिलेल्या शोक संदेशात म्हटले आहे की, देशातील ख्यातनाम खेळाडू पद्मश्री जसपाल राणा यांच्या अकाली निधनाबद्दल राष्ट्रीय स्वयंसेवक संघ तीव्र शोक व्यक्त करतो. ते अर्जुन पुरस्काराने सन्मानित नेमबाज होतेच, तसेच उच्च दर्जाचे आणि प्रतिष्ठित प्रशिक्षकही होते. त्यांच्या या योगदानासाठी त्यांना द्रोणाचार्य पुरस्कारानेही गौरविण्यात आले होते. त्यांनी क्रीडाक्षेत्राच्या माध्यमातून आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताचा सन्मान वाढवला. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करीत असून, ईश्वरचरणी प्रार्थना करतो की त्यांच्या आत्म्यास सद्गती लाभो अशा शब्दात संघाकडून श्रद्धांजली अर्पण करण्यात आली आहे.

राणा यांचा जन्म 28 जून 1976 रोजी उत्तराखंडमधील उत्तरकाशी येथे एका क्रीडाप्रेमी कुटुंबात झाला होता. त्यांचे वडील नारायण सिंह राणा हे देखील नेमबाजीशी संबंधित होते आणि तेच त्यांचे पहिले प्रशिक्षक होते.जसपाल राणा यांनी अल्पवयातच नेमबाजीतील आपल्या असामान्य प्रतिभेची छाप पाडली आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर भारतातील सर्वात यशस्वी नेमबाजांपैकी एक म्हणून ओळख निर्माण केली. त्यांनी एशियन गेम्स आणि कॉमनवेल्थ गेम्समध्ये भारतासाठी अनेक पदके जिंकली. राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धांमध्ये त्यांनी एकूण 15 पदके (त्यात 9 सुवर्णपदकांचा समावेश) जिंकून ऐतिहासिक कामगिरी नोंदवली. या देदिप्यमान कामगिरीबद्दल राणा यांना 1994 मध्ये अर्जुन पुरस्कार आणि 1997 मध्ये पद्मश्रीने गौरविण्यात आले होते.

------------------------

हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis


 rajesh pande