अमेरिका-इराण शांतता करारावर शुक्रवारी स्वाक्षरी, पंतप्रधान मोदींकडून स्वागत
नवी दिल्ली, 15 जून (हिं.स.)अमेरिका-इराण शांतता कराराची घोषणा करण्यात आली असून, शुक्रवारी स्वित्झर्लंडमध्ये त्यावर स्वाक्षरी होणार आहे. जगभरातील नेत्यांनी याचे स्वागत केले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संघर्ष संपवण्यासाठी झालेल्या या कराराबद्दल
पंतप्रधान नरेंद्र मोदी


नवी दिल्ली, 15 जून (हिं.स.)अमेरिका-इराण शांतता कराराची घोषणा करण्यात आली असून, शुक्रवारी स्वित्झर्लंडमध्ये त्यावर स्वाक्षरी होणार आहे. जगभरातील नेत्यांनी याचे स्वागत केले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संघर्ष संपवण्यासाठी झालेल्या या कराराबद्दल कौतुक व्यक्त केले आहे.

सोशल मीडियावर पोस्ट करत त्यांनी लिहिले, पश्चिम आशियातील संघर्ष संपवण्यासाठी अमेरिका आणि इराण यांच्यात झालेल्या कराराचे मी स्वागत करतो. या संघर्षामुळे जगभरात गंभीर आर्थिक गोंधळ निर्माण झाला आहे आणि अनेक देशांमध्ये जीवित व मालमत्तेचे नुकसान झाले आहे.

त्यांनी पुढे लिहिले, भारताला आशा आहे की या कराराच्या अंमलबजावणीमुळे या प्रदेशात शांतता आणि स्थिरता पुनर्संचयित होण्यास मदत होईल आणि मुक्त संचार व व्यापार सुनिश्चित होईल. आम्हाला आशा आहे की उर्वरित मुद्द्यांवरील वाटाघाटींमुळे एक चिरस्थायी आणि अंतिम तोडगा निघेल.

अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणसोबत शांतता करार झाल्याची घोषणा केल्यानंतर पंतप्रधान मोदींनी ही प्रतिक्रिया दिली आहे. ट्रम्प यांनी म्हटले आहे की, या करारानुसार अमेरिका होर्मुझच्या सामुद्रधुनीवरील आपली नाकेबंदी उठवेल आणि इराणदेखील जहाजांच्या मुक्त वाहतुकीची खात्री देईल. इराणने हा करार झाल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे.

अमेरिका आणि इराण यांच्यातील शांतता करारावर शुक्रवारी स्वित्झर्लंडमधील जिनिव्हा येथे स्वाक्षरी केली जाईल. अमेरिका आणि इराण यांच्यातील शांतता कराराच्या घोषणेमुळे जगभरातील बाजारांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. आज आशियाई बाजारांमध्ये तेजी आली आणि जागतिक कच्च्या तेलाच्या किमतीही घसरल्याने परिस्थिती पूर्ववत होण्याची आशा वाढली आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / वृषाली देशपांडे


 rajesh pande