
रायगड, 13 जून (हिं.स.)। : महाराष्ट्राच्या लोकसंस्कृतीचे प्रतीक मानली जाणारी वासुदेव परंपरा आज अस्तित्वाच्या संकटाचा सामना करत आहे. एकेकाळी पहाटेच्या वेळी घराघरांत हरिनामाचा गजर करत लोकांना जागे करणारे वासुदेव आता क्वचितच दिसून येतात. बदलती जीवनशैली, लोकांचा कमी होत चाललेला प्रतिसाद आणि घटते आर्थिक पाठबळ यामुळे या पारंपरिक लोककलावंतांची संख्या झपाट्याने घटत असल्याचे चित्र आहे.
वासुदेव ही महाराष्ट्रातील प्राचीन लोकपरंपरा आहे. डोक्यावर मोरपिसांनी सजविलेली टोपी, अंगावर पारंपरिक वेशभूषा, हातात चिपळ्या घेऊन वासुदेव पहाटे गावात फिरत असतो. “वासुदेव आला हो, वासुदेव आला, सकाळच्या पारी हरिनाम बोला” असा संदेश देत तो विठ्ठल-रुक्मिणीवरील अभंग, गवळणी आणि भक्तिगीते सादर करतो. लोकांकडून मिळणाऱ्या दानावर त्यांची उपजीविका चालत असे.
रायगड जिल्ह्यातील अनेक गावांमध्ये एकेकाळी वासुदेवांचा पहाटेचा हरिनामाचा गजर नियमित ऐकू येत असे. ग्रामीण भागातील लोक त्यांच्या आगमनाची वाट पाहत असत. मात्र आज ही परंपरा जपणारे मोजकेच वासुदेव उरले आहेत. “पूर्वी लोक आदराने दान देत असत. आता अनेकांना या परंपरेचे महत्त्व माहिती नाही. त्यामुळे अनेकांनी हा व्यवसाय सोडला आहे,” अशी खंत एका वासुदेवाने व्यक्त केली.
ऐतिहासिकदृष्ट्याही वासुदेवांचे महत्त्व मोठे मानले जाते. छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात गावोगावी फिरण्याच्या त्यांच्या सवयीमुळे त्यांचा गुप्त माहिती गोळा करण्यासाठी उपयोग केला जात असल्याचे सांगितले जाते.लोककला, भक्ती आणि सामाजिक संदेश यांचा संगम असलेली ही परंपरा जतन करण्यासाठी शासन आणि समाजाने पुढाकार घेण्याची गरज व्यक्त होत आहे. अन्यथा महाराष्ट्राच्या सांस्कृतिक वारशाचा हा महत्त्वाचा घटक भविष्यात इतिहासजमा होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / संदेश साळुंके (रायगड)