
जोराहाट(आसाम), 13 जून (हिं.स.) आसामच्या जोरहाट येथे भारतीय हवाई दलाच्या वाहतूक विमानाचा अपघात होऊन 5 जवान हुतात्मा झाले आहेत. भारतीय हवाई दलाच्या अधिकाऱ्यांनी या मृत्यूंची पुष्टी केली आहे. हा अपघात शनिवारी जोरहाट हवाई तळावर झाला.
प्राथमिक माहितीनुसार, हवाई दलाचे एएन-३२ हे वाहतूक विमान जोरहाट स्टेशनवर कोसळले. आदळल्यानंतर त्याला आग लागली. अपघाताच्या फोटो आणि व्हिडिओमध्ये वाहतूक विमानाचे दोन तुकडे झाल्याचे दिसत होते. आता हवाई दलाकडून अधिकृत पुष्टी मिळाल्यानंतर, या अपघातात पाच जवानांचा मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले आहे. हवाई दलाची आपत्कालीन प्रतिसाद पथके सध्या घटनास्थळी कार्यरत आहेत. हवाई दलाने अपघाताचे कारण निश्चित करण्यासाठी चौकशी समितीचे आदेशही दिले आहेत. हवाई दलाने सांगितले की, आसाममधील जोरहाट हवाई तळावर एएन-३२ या वाहतूक विमानाचा अपघात होऊन पाच भारतीय हवाई दलाचे जवान शहीद झाले आहेत. सह-वैमानिक बचावले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. अपघाताचे कारण निश्चित करण्यासाठी चौकशी समितीचे आदेश देण्यात आले आहेत.
भारतीय हवाई दलाने या अपघातात पाच जवानांच्या मृत्यूची पुष्टी केली आहे. त्यांनी 'एक्स' या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर लिहिले आहे की, आसाममधील जोरहाट येथे झालेल्या एएन-३२ विमान अपघातात आपल्या पाच जवानांना गमावल्याने भारतीय हवाई दल अत्यंत दुःखी आहे. स्क्वाड्रन लीडर प्रशांत सिंग, फ्लाइट लेफ्टनंट शुभम कुमार, सार्जंट जितेंद्र शर्मा, अग्निवीर एअरमन खेमाराम कुमावत आणि अग्निवीर एअरमन दानिश आलम यांनी कर्तव्य बजावत असताना सर्वोच्च बलिदान दिले. हवाई दलाने आपल्या पोस्टमध्ये नमूद केलेय की, भारतीय हवाई दल शोकाकुल कुटुंबियांप्रति तीव्र शोकसंवेदना व्यक्त करते आणि दुःखाच्या या प्रसंगी त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे.
एएन-३२ हे एक मालवाहू विमान आहे. भारतीय हवाई दलाच्या ताफ्यात अशी १०० विमाने आहेत. लष्करासाठी उत्कृष्ट वाहतुकीकरिता डिझाइन केलेले हे विमान, भारतीय हवाई दलाच्या वाहतूक क्षमतेत सातत्याने वाढ करत आहे आणि उष्ण हवामान व जास्त उंचीवरील मोहिमांदरम्यान लष्कराला अधिक मजबूत करत आहे. यामुळे हे विमान अत्यंत महत्त्वाचे मानले जाते. ते एका वेळी ६ ते ७ टन माल आणि ४० ते ५० सैनिक वाहून नेऊ शकते. एएन-३२ ची रचना कठीण परिस्थितीतही सर्वोत्तम कामगिरी करण्यासाठी केली आहे.
-------------------------
हिंदुस्थान समाचार / वृषाली देशपांडे