
अहमदाबाद, 13 जून, (हिं.स.)। 'डिरेक्टोरेट ऑफ रेव्हेन्यू इंटेलिजन्स'ने (DRI) अहमदाबाद आंतरराष्ट्रीय विमानतळावर एक मोठी कारवाई केली आहे. दुबईहून आलेल्या 'इंडिगो' विमानातील शौचालयातून सुमारे ४ कोटी रुपये किमतीचे बेकायदेशीर सोने जप्त करण्यात आले आहे.
तपासणी दरम्यान, अधिकाऱ्यांना शौचालयातील स्पीकर बॉक्समध्ये काळ्या टेपने गुंडाळलेल्या दोन पिशव्या (पाउचेस) सापडल्या. यामध्ये एकूण २,७९९.३ ग्रॅम (सुमारे २.८ किलो) वजनाचे सोन्याचे २४ बिस्किट्स होते.
विमानातून सोन्याची तस्करी होत असल्याची माहिती अधिकाऱ्यांना मिळाली होती. गुरुवारी दुबईहून 'इंडिगो'चे विमान ६E-१४७८ अहमदाबादला पोहोचताच तपासणी सुरू करण्यात आली. या तपासणीदरम्यान पथकाने विमानातील शौचालयाची कसून तपासणी केली. जेव्हा अधिकाऱ्यांनी शौचालयातील स्पीकर बॉक्स काढला, तेव्हा तो असामान्यपणे जड असल्याचे त्यांच्या लक्षात आले. तो उघडल्यावर त्यांना आत काळ्या टेपने गुंडाळलेल्या दोन पिशव्या आढळल्या. तस्करीचे सोने विमानात आणणाऱ्या व्यक्तीची ओळख पटवण्यासाठी तपास यंत्रणा सध्या काम करत आहेत.
---------------
हिंदुस्थान समाचार / हर्षदा गावकर