परभणी - गोदावरी पात्रात बुडाल्याने एकाच कुटुंबातील तीन जणींचा मृत्यू
परभणी, 14 जून, (हिं.स.)। सोनपेठ तालुक्यातील मोहळा येथे गोदावरी नदीच्या पात्रात आंघोळीसाठी गेलेल्या दोन सख्ख्या बहिणींचा पाण्यात बुडून मृत्यू झाला, तर त्यांना वाचवण्यासाठी गेलेल्या त्यांच्या चुलतीलाही प्राणास मुकावे लागले. या भीषण दुर्घटनेत एकाच कुट
गोदावरी पात्रात बुडाल्याने एकाच कुटुंबातील तीन जणींचा मृत्यू, सोनपेठ तालुक्यातील घटना


परभणी, 14 जून, (हिं.स.)। सोनपेठ तालुक्यातील मोहळा येथे गोदावरी नदीच्या पात्रात आंघोळीसाठी गेलेल्या दोन सख्ख्या बहिणींचा पाण्यात बुडून मृत्यू झाला, तर त्यांना वाचवण्यासाठी गेलेल्या त्यांच्या चुलतीलाही प्राणास मुकावे लागले. या भीषण दुर्घटनेत एकाच कुटुंबातील तीन महिलांचा मृत्यू झाल्याने संपूर्ण परिसरात आणि मोहळा गावावर शोककळा पसरली आहे.

मोहळा येथील रहिवासी उत्तम देवीदास जाधव यांच्या दोन मुली उत्कर्षा (वय १८ वर्ष) आणि समीक्षा (वय १६ वर्ष) या आज रविवारी (दि.१४) सकाळी गावाजवळून वाहणाऱ्या गोदावरी नदीत आंघोळीसाठी गेल्या होत्या. आंघोळ करत असताना पाण्याचा अंदाज न आल्याने दोन्ही बहिणी नदीच्या पात्रात बुडू लागल्या. यावेळी त्यांनी मदतीसाठी आरडा ओरडा केला. त्याच वेळी नदीकाठावर असलेल्या सिंधू दत्ता जाधव (वय ४५ वर्ष) यांनी दोन्ही मुलींना पाण्यात बुडताना पाहिले. आपल्या पुतण्यांना वाचवण्यासाठी त्यांनी कसलाही विचार न करता तात्काळ नदीच्या पाण्यात उडी घेतली. मात्र, पाण्याचा अंदाज न आल्याने आणि खोली जास्त असल्यामुळे दोन्ही मुलींना वाचवण्याच्या प्रयत्नात सिंधू जाधव याही पाण्यात बुडाल्या. स्वतःचा जीव वाचविण्यासाठी काही काळ चाललेली या तिघींचीही धडपड अखेर थांबली. काही वेळातच तिघींचाही पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाला.

या घटनेची माहिती गावातील लहूदास रामराव जाधव यांनी मृत मुलींचे चुलते दौलत साहेबाराव जाधव यांना मोबाईलवरून दिली. घटनेची माहिती मिळताच दौलत जाधव यांच्यासह गावातील अनेक नागरिकांनी गोदावरी नदीकाठाकडे धाव घेतली. नदीकाठावर हजर असलेल्या रेखा लहूदास जाधव यांनी प्रत्यक्ष घडलेला प्रकार ग्रामस्थांना सांगितला. त्यानंतर गावातील स्थानिक पोहणारे व नागरिकांनी बोरीच्या झाडाच्या फासाच्या (गळ) साहाय्याने नदीच्या पाण्यात शोधमोहीम सुरू केली. अथक प्रयत्नांनंतर तिघींचेही मृतदेह पाण्याखाली आढळून आले. ग्रामस्थांनी तिन्ही मृतदेह नदीपात्राबाहेर काढून रुग्णवाहिकेच्या साहाय्याने उत्तरिय तपासणीसाठी सोनपेठ येथील शासकीय दवाखान्यात दाखल केले.

या संदर्भात मृत मुलींचे चुलते दौलत साहेबाराव जाधव (वय ४६ वर्षे, व्यवसाय: शेती, रा. मोहळा) यांनी सोनपेठ पोलीस ठाण्यात रीतसर जवाब नोंदवला. या मृत्यूबद्दल कुटुंबातील कोणावरही कोणताही संशय अथवा तक्रार नसल्याचे त्यांनी आपल्या जबाबात स्पष्ट केले आहे. सोनपेठ पोलीस या प्रकरणाचा पुढील कायदेशीर तपास करत आहेत. एकाच कुटुंबातील तीन जणींचा दुर्दैवी अंत झाल्याने गावावर शोककळा पसरली आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Chaitanya JayantRao Chitnis


 rajesh pande