
लातूर, 14 जून (हिं.स.)।
आमदार रोहित पवार यांच्या अन्नत्याग आंदोलनाला पाठिंबा; अहमदपुरात राष्ट्रवादी पदाधिकाऱ्यांचे उपोषण सुरू
शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे युवा नेते तथा आमदार रोहित पवार यांनी तीर्थक्षेत्र पंढरपूर येथे सुरू केलेल्या अन्नत्याग आंदोलनाला सक्रिय पाठिंबा देण्यासाठी, अहमदपूर येथील पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यासमोरील उपोषणस्थळी अन्नत्याग आंदोलन सुरू केले आहे. या आंदोलनाचा आज दुसरा दिवस असून, जोपर्यंत सरकार शेतकरी हिताचा ठोस निर्णय घेत नाही, तोपर्यंत हा लढा सुरूच राहणार असल्याचा निर्धार पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे.
गेल्या काही वर्षांपासून आर्थिक संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना शासनाने जाहीर केलेल्या कर्जमाफीच्या अटी अत्यंत जाचक वाटत असून, त्या रद्द करून शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफीचा लाभ मिळावा, ही या आंदोलनाची मुख्य मागणी आहे. यामध्ये प्रामुख्याने २०१९ च्या कर्जमाफीचा लाभ घेतलेल्या शेतकऱ्यांवरील ५० हजारांची मर्यादा रद्द करून सर्व शेतकऱ्यांना सरसकट २ लाखांपर्यंत कर्जमाफी मिळावी, एकवेळ समझोता योजनेतील अटी रद्द कराव्यात आणि २ लाखांहून अधिक थकबाकी असलेल्या शेतकऱ्यांच्या अटी शिथिल करून त्यांना सरसकट कर्जमाफीचा लाभ द्यावा, अशा मागण्या करण्यात आल्या आहेत.
यासोबतच प्रोत्साहनपर अनुदान देताना सलग दोन वर्षे नियमित कर्ज भरण्याची अट रद्द करावी, २०१७ च्या कर्जमाफीपासून वंचित राहिलेल्या ६.५६ लाख शेतकऱ्यांना तत्काळ लाभ मिळावा, पीकविमा योजनेतील जाचक अटी काढून १ रुपयात पीकविमा योजना लागू करावी आणि पेरणीपूर्वी कर्ज खात्यांचे पुनर्गठन करून शेतकऱ्यांना बियाणे व खतांसाठी मदत करावी, या मागण्यांचाही समावेश आहे.
या आंदोलनात राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे अहमदपूर तालुका युवक अध्यक्ष संग्राम बापूसाहेब पवार, जिल्हा सरचिटणीस केदार आप्पा काडवदे, पदवीधर सेलचे कार्याध्यक्ष राजकुमार रामराव बोडके यांच्यासह पक्षाचे अनेक कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले आहेत. आम्हाला कर्जवसुली नको, कर्जमाफी हवी आहे, अशी आक्रमक भूमिका घेत, आंदोलकांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यासमोरील उपोषणस्थळी आपला लढा तीव्र केला आहे.
आमदार रोहित पवार यांच्या पंढरपूर येथील अन्नत्याग आंदोलनाचा आज चौथा दिवस असून, अहमदपूर येथील कार्यकर्त्यांनी त्यांना पाठिंबा दर्शवत प्रशासनाचे लक्ष वेधून घेतले आहे. सरकार आता या आंदोलनाची दखल घेऊन काय भूमिका घेते, याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.
या आंदोलनाला संभाजी बिग्रेड ,भारतीय राष्ट्रीय कांग्रेस पक्ष तसेच तालुक्यातील शेतकरी शेतकरी बांधवांनी पाठींबा दिला आहे
---------------
हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis