आयुष मंत्रालयाचा यूट्यूब थेट योग प्रक्षेपणाच्या सर्वाधिक प्रेक्षक संख्येचा नवा गिनीज विश्व विक्रम
* आंतरराष्ट्रीय योग दिन 2026 पूर्वी आयोजित जागतिक ऑनलाइन योग कार्यक्रमात 4,35,831 प्रमाणित प्रेक्षकांचा सहभाग नवी दिल्ली, 14 जून (हिं.स.) - आंतरराष्ट्रीय योग दिन (आयडीवाय) 2026 पूर्वीच्या एका ऐतिहासिक कामगिरीत, आयुष मंत्रालयाने आज यूट्यूब थेट
योग


* आंतरराष्ट्रीय योग दिन 2026 पूर्वी आयोजित जागतिक ऑनलाइन योग कार्यक्रमात 4,35,831 प्रमाणित प्रेक्षकांचा सहभाग

नवी दिल्ली, 14 जून (हिं.स.) -

आंतरराष्ट्रीय योग दिन (आयडीवाय) 2026 पूर्वीच्या एका ऐतिहासिक कामगिरीत, आयुष मंत्रालयाने आज यूट्यूब थेट योग प्रक्षेपणासाठी सर्वाधिक प्रेक्षकसंख्येचा नवा गिनीज विश्व विक्रम प्रस्थापित केला. आयुष मंत्रालयाच्या अधिकृत यूट्यूब वाहिनीवर थेट प्रक्षेपित करण्यात आलेल्या विशेष जागतिक ऑनलाइन योग सत्रात 4,35,831 प्रेक्षक सहभागी झाले.

हा विक्रम प्रयत्न आयुष मंत्रालयाच्या आंतरराष्ट्रीय योग दिन (आयडीवाय) 2026 साठीच्या जनजागृती उपक्रमांचा एक भाग म्हणून आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात भारतासह जगभरातील योग साधक, विद्यार्थी, संस्था, व्यावसायिक आणि आरोग्य जागरूक नागरिकांनी उत्साहाने सहभाग घेतला. या कार्यक्रमात प्रमाणित योग कार्यपद्धती(सीवायपी) सादर करण्यात आली आणि ‘योग 365’ चळवळीच्या माध्यमातून योग दैनंदिन जीवनाचा भाग बनविण्याच्या मंत्रालयाच्या दृष्टिकोनाला बळकटी मिळाली.

आयुष मंत्रालयाने 4,35,831 प्रमाणित प्रेक्षकांची नोंद केली, ज्यामुळे 2024 मध्ये प्रस्थापित झालेला 2,46,252 प्रेक्षकांचा गिनीज विश्व विक्रम मागे पडला. नव्या विक्रमाने मागील मानांकित नोंदीपेक्षा 1,89,579 अधिक प्रेक्षकांची नोंद करत यूट्यूब थेट योग प्रक्षेपणाच्या सर्वाधिक प्रेक्षकसंख्येचा नवा जागतिक विक्रम प्रस्थापित केला.

या प्रसंगी सहभागी नागरिकांना संबोधित करताना आयुष राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार) आणि आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी या ऐतिहासिक यशात योगदान देणाऱ्या जगभरातील नागरिकांचे अभिनंदन केले. ते म्हणाले, “आजची ही कामगिरी आरोग्य आणि कल्याणासाठीच्या सामायिक बांधिलकीद्वारे योग लोकांना प्रदेश, संस्कृती आणि राष्ट्रांच्या सीमा ओलांडून कसे जोडू शकतो, याचे उत्कृष्ट उदाहरण आहे. हा नवा गिनीज विश्व विक्रम योग याला जीवनपद्धती म्हणून मिळत असलेल्या जागतिक मान्यतेचे प्रतिबिंब आहे आणि योग दैनंदिन जीवनाचा अविभाज्य भाग बनविण्याच्या आपल्या सामूहिक संकल्पाला अधिक दृढ करतो. आंतरराष्ट्रीय योग दिन 2026 कडे वाटचाल करत असताना, मी सर्वांना ‘योग 365’ ची भावना आत्मसात करण्याचे आणि अधिक निरोगी, सक्षम व लवचिक समाज उभारण्यासाठी योगदान देण्याचे आवाहन करतो.”

आयुष मंत्रालयाचे सचिव वैद्य राजेश कोटेचा यांनी या ऐतिहासिक यशात योगदान देणाऱ्या सर्व भागधारक आणि सहभागींचे अभिनंदन करत म्हटले, “ही कामगिरी केवळ नवा जागतिक विक्रम प्रस्थापित करण्यापुरती मर्यादित नाही; तर आपण जगाला देत असलेल्या संदेशाशीही संबंधित आहे. या प्रचंड सहभागातून योग हे आरोग्य आणि कल्याणासाठीचे प्रभावी साधन म्हणून अधिकाधिक मान्यता मिळवत असल्याचे दिसून येते. योग हा केवळ एका दिवसाचा कार्यक्रम नसून आयुष्यभराची साधना म्हणून स्वीकारला जावा आणि ‘योग 365’ प्रत्यक्षात उतरावा, हा आमचा उद्देश आहे.”

या कार्यक्रमादरम्यान अनेक मान्यवर मंत्र्यांचे विशेष संदेश प्रसारित करण्यात आले. त्यामध्ये ओडिशाचे आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री मुकेश महालिंग, संसदीय कामकाज मंत्री व अल्पसंख्याक व्यवहार मंत्री किरेन रिजिजू आणि मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री डॉ. मोहन यादव यांचा समावेश होता. या ऐतिहासिक यशाबद्दल सहभागींचे अभिनंदन करताना त्यांनी प्रतिबंधात्मक आरोग्यसेवा आणि सर्वांगीण कल्याणासाठी योग, याचे महत्त्व अधोरेखित केले तसेच नागरिकांनी आपल्या दैनंदिन जीवनात योग समाविष्ट करून ‘योग 365’ ची भावना जोपासावी, असे आवाहन केले.

हा कार्यक्रम आयुष मंत्रालयाने मोरारजी देसाई राष्ट्रीय योग संस्था आणि इतर सहयोगी संस्थांच्या सहकार्याने आयोजित केला होता. भारतासह जगभरातील सहभागी आयुष मंत्रालयाच्या अधिकृत यूट्यूब वाहिनीद्वारे या थेट सत्रात सहभागी झाले आणि त्यांनी एकत्रितपणे प्रमाणित योग कार्यपद्धती(सीवायपी) सादर केली. कार्यक्रमादरम्यान हॅबिल्ड संघाने तज्ज्ञ मार्गदर्शन प्रदान केले.

भारत ‘निरोगी आयुष्यासाठी योग’ या संकल्पनेखाली आंतरराष्ट्रीय योग दिन 2026 साजरा करण्याच्या तयारीत असताना ही कामगिरी नोंदवली गेली आहे. ही संकल्पना निरोगी आणि दीर्घायुषी जीवन, जीवनमान उन्नती तसेच सर्व वयोगटांमध्ये शारीरिक, मानसिक आणि भावनिक आरोग्य वृद्धिंगत करण्यामधील योग याची भूमिका अधोरेखित करते. आंतरराष्ट्रीय योग दिन 2026 चा मुख्य कार्यक्रम 21 जून रोजी पश्चिम बंगालमधील कोलकाता येथे आयोजित केला जाणार असून, त्यात योगप्रेमी, साधक आणि विविध भागधारक एकत्र येऊन आरोग्य आणि सुसंवादासाठीच्या या जागतिक चळवळीचा उत्सव साजरा करतील.

या ऐतिहासिक यशात योगदान देणाऱ्या सर्व सहभागी, योग संस्था, शैक्षणिक संस्था, शासकीय विभाग, खासगी संस्था, सामाजिक संघटना आणि जगभरातील भारतीय वंशाच्या नागरिकांचे आयुष मंत्रालयाने आभार मानले.

देश आंतरराष्ट्रीय योग दिन 2026 कडे वाटचाल करत असताना, आयुष मंत्रालयाने पुन्हा एकदा नागरिकांना योगाला जीवनशैली म्हणून स्वीकारण्याचे आणि “प्रत्येक घरात योग, दररोज योग” हा संदेश पुढे नेण्याचे आवाहन केले.

---------------

हिंदुस्थान समाचार / सुधांशू जोशी


 rajesh pande