
पुणे, 14 जून (हिं.स.)। हिंजवडी ते शिवाजीनगर मेट्रो प्रकल्पाचे काम नोव्हेंबर 2019 पासून सुरू असले तरी पहिल्या टप्प्यातील हिंजवडी ते बाणेर दरम्यानच्या स्थानकांवरील अनेक कामे अद्याप अपूर्ण असल्याचे वास्तव समोर आले आहे. त्यामुळे मेट्रो सेवा सुरू करण्याबाबत प्रशासनाकडून होत असलेल्या घोषणांवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
पहिल्या टप्प्यातील स्थानकांवर बॅग तपासणी यंत्रणा, तिकीट व्हेंडिंग मशिन, स्वयंचलित जिने, लिफ्ट आणि स्वयंचलित दरवाजे बसविण्यात आले असले तरी त्यापैकी बहुतांश यंत्रणा अद्याप कार्यान्वित झालेल्या नाहीत. काही ठिकाणी लिफ्ट बंद अवस्थेत आहेत, तर सरकत्या जिन्यांना वीजपुरवठाच उपलब्ध नसल्याचे दिसून आले. तसेच फॅब्रिकेशन, मार्बल बसविणे, सिलिंग आणि इतर नागरी कामेही अपूर्ण आहेत.हिंजवडी-शिवाजीनगर मेट्रोच्या पहिल्या टप्प्याचे उद्घाटन आतापर्यंत सहा वेळा पुढे ढकलण्यात आले आहे. तरीही स्थानकांची सद्यस्थिती पाहता प्रवासी सेवा सुरू होण्यास आणखी विलंब होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.या प्रकल्पाचे नियंत्रण पुणे महानगर प्रादेशिक विकास प्राधिकरणाकडे (पीएमआरडीए) आहे. महानगर आयुक्त डॉ. अभिजित चौधरी आणि अतिरिक्त महानगर आयुक्त के. मंजूलक्ष्मी यांनी अलीकडे विविध स्थानकांची पाहणी करून संबंधित विभागांना सूचना दिल्या आहेत. मात्र त्यानंतरही कामाच्या गतीत विशेष सुधारणा झालेली नसल्याने प्रशासनावर टीका होत आहे.स्थानकांवरील अपूर्ण कामे आणि बंद अवस्थेतील सुविधा पाहता मेट्रो प्रकल्प अद्याप पूर्ण क्षमतेने कार्यान्वित होण्यासाठी तयार नसल्याचे चित्र स्पष्ट होत आहे.
--------------
हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु