पुणे - महापालिकेच्या शाळांचा ‘बाजार’ मांडल्याचा आरोप
पुणे, 14 जून (हिं.स.)। महापालिकेच्या इंग्रजी माध्यमाच्या पाच शाळा खासगी संस्थेला चालविण्यास देण्याचा प्रस्ताव प्रशासनाने स्थायी समितीसमोर मंजुरीसाठी ठेवला असून, यामुळे महापालिकेवर तब्बल 100 कोटी रुपयांचा आर्थिक भार पडणार आहे. या प्रस्तावावरून पालिक
pmc


पुणे, 14 जून (हिं.स.)। महापालिकेच्या इंग्रजी माध्यमाच्या पाच शाळा खासगी संस्थेला चालविण्यास देण्याचा प्रस्ताव प्रशासनाने स्थायी समितीसमोर मंजुरीसाठी ठेवला असून, यामुळे महापालिकेवर तब्बल 100 कोटी रुपयांचा आर्थिक भार पडणार आहे. या प्रस्तावावरून पालिकेच्या शैक्षणिक धोरणाबाबत प्रश्न उपस्थित होत आहेत.शहरातील विविध भागांतील इंग्रजी माध्यमाच्या पाच शाळा 2007 पासून The Akanksha Foundation या संस्थेकडून खासगी सहभाग तत्त्वावर चालविल्या जात आहेत. या शाळांच्या इमारती, वीज व्यवस्था, भौतिक सुविधा तसेच विद्यार्थ्यांना गणवेश व शालेय साहित्य महापालिकेकडूनच उपलब्ध करून दिले जाते. तर शिक्षक आणि इतर कर्मचाऱ्यांचे वेतन संबंधित संस्था CSR निधीतून भागवत होती.मात्र, CSR निधी उभारण्यात अडचणी येत असल्याचे कारण देत संस्थेने महापालिका प्रशासनाकडे आर्थिक सहाय्याची मागणी केली होती. त्यानंतर प्रशासनाने या प्रस्तावाला गती दिली. केवळ एकाच संस्थेला निधी दिल्याचा आक्षेप येऊ नये म्हणून डिसेंबर 2025 मध्ये निविदा प्रक्रिया राबविण्यात आली.प्रस्तावानुसार, शाळांमध्ये शिकणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्यामागे दरवर्षी 25 हजार रुपये संस्थेला देण्यात येणार आहेत. नऊ वर्षांच्या कालावधीत यासाठी सुमारे 100 कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे.महत्त्वाचे म्हणजे विद्यार्थ्यांच्या अनेक मूलभूत सुविधा आणि शालेय साहित्याचा खर्च महापालिकेकडून आधीच केला जात असताना अतिरिक्त निधी देण्याची गरज काय, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. त्यामुळे स्वयंसेवी संस्थांच्या माध्यमातून महापालिकेच्या शाळांचे व्यवस्थापन आणि त्यासाठी होणारा खर्च यावर चर्चा सुरू झाली आहे.हा प्रस्ताव स्थायी समितीसमोर मंजुरीसाठी ठेवण्यात आला असून त्यावर अंतिम निर्णय झाल्यानंतर पुढील कार्यवाही केली जाणार आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु


 rajesh pande