
परभणी, 14 जून (हिं.स.) : “ज्या गोष्टींचे आपण ध्यान करतो, त्याचे गुण आपल्यात उतरतात. त्यामुळे जीवन उद्धारक विचारांवर लक्ष केंद्रित करणे आवश्यक आहे,” असे प्रतिपादन वे.शा.सं.ह.भ.प. पद्मनाभ महाराज व्यास (धाराशिव) यांनी केले.परभणी शहरातील ‘भक्तितीर्थ’ साई मंदिरात कुलकर्णी परिवाराच्या वतीने पुरुषोत्तम मासानिमित्त आयोजित श्रीमद्भागवत कथा ज्ञानयज्ञाच्या पहिल्या दिवशी ते बोलत होते.
यावेळी महाराजांनी सांगितले की, शुद्ध क्रिया, विचार, शब्द आणि आचरण यांमधूनच जीवनात मंगलता निर्माण होते. “संकल्प शक्तीशाली असेल तर तो नक्की सिद्धीस जातो. श्रीमद्भागवत हे जीवन समृद्ध करणारे पवित्र ग्रंथ असून, आपल्या हृदयातील ईश्वराचा साक्षात्कार घडविणे हेच त्याचे प्रमुख प्रयोजन आहे,” असे त्यांनी स्पष्ट केले.
ते म्हणाले की, वेदरूपी कल्पतरूचे रसस्वरूप फळ म्हणजे श्रीमद्भागवत होय. हा ग्रंथ सर्वांसाठी असून, त्यातून जीवनाचा खरा सार समजतो. सात्विक आहारातून मन शुद्ध होते आणि निष्काम भक्ती ही सर्वोच्च मानली जाते. लौकिक आणि धनाच्या चिंतेत अडकण्याऐवजी भक्तीमय जीवनातून खरा आनंद मिळतो.
कथेच्या प्रारंभी राहुल शशिकांत कुलकर्णी आणि अतुल शरद कुलकर्णी यांनी सपत्नीक आरती व ग्रंथपूजन केले. यावेळी अभंग गायन सादर करण्यात आले. सूत्रसंचालन प्रकाश कुरुंदकर यांनी केले.
या कार्यक्रमास अनेक मान्यवरांसह मोठ्या संख्येने भाविक उपस्थित होते.
-------------------
हिंदुस्थान समाचार / Chaitanya JayantRao Chitnis