
मुंबई, 14 जून (हिं.स.)। श्रीक्षेत्र भीमाशंकर परिसराचा धार्मिक, सांस्कृतिक आणि पर्यटनदृष्ट्या शाश्वत विकास साधण्यासाठी प्रस्तावित करण्यात आलेल्या ‘भीमाशंकर हेरिटेज वाडी’ प्रकल्पाच्या जागेची पाहणी उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजितदादा पवार यांनी आज केली.
यावेळी त्यांनी भाविकांसाठी प्रस्तावित विविध सुविधांचा सविस्तर आढावा घेतला. भीमाशंकरच्या धार्मिक, सांस्कृतिक आणि पर्यावरणीय महत्त्वाचा विचार करून विकास आणि संवर्धन यांचा समतोल राखत प्रकल्पाची प्रभावी अंमलबजावणी करण्याबाबत संबंधित अधिकाऱ्यांना आवश्यक सूचना दिल्या. ‘भीमाशंकर हेरिटेज वाडी’ प्रकल्पामुळे भीमाशंकरच्या सांस्कृतिक वारशाचे जतन होण्यास मदत होईल. तसेच ग्रामस्थांच्या जीवनमानात सुधारणा, भाविकांसाठी दर्जेदार सुविधा उपलब्ध होणे आणि पर्यटन विकासाला चालना मिळून संपूर्ण परिसराचे सकारात्मक परिवर्तन घडेल, असा विश्वास सुनेत्रा अजित पवार यांनी व्यक्त केला.
यानंतर त्यांनी श्रीक्षेत्र भीमाशंकर येथे ज्योतिर्लिंगाचे दर्शन घेऊन आरती केली. तसेच 'एल निनो' च्या संभाव्य संकटामुळे महाराष्ट्रातील शेतकरी आणि सर्वसामान्य नागरिकांना कोणत्याही प्रकारचा त्रास होऊ नये, अशी प्रार्थनाही केली. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व माजी मंत्री आमदार दिलीप वळसे-पाटील, माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील,माजी आमदार अतुल बेनके तसेच इतर पदाधिकारी उपस्थित होते.
---------------
हिंदुस्थान समाचार / हर्षदा गावकर