रत्नागिरी : आ. प्रमोद जठार यांनी मांडला मोदी सरकारच्या तपपूर्तीचा लेखाजोखा
रत्नागिरी, 14 जून (हिं.स.) । २६ मे रोजी केंद्रामधील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारला १२ वर्षे यशस्वीरीत्या पूर्ण झाली आहेत. या पार्श्वभूमीवर, भारतीय जनता पक्षातर्फे आयोजित पत्रकार परिषदेत भाजप नेते आमदार प्रमोद जठार यांनी मोदी स
रत्नागिरी : आ. प्रमोद जठार यांनी मांडला मोदी सरकारच्या तपपूर्तीचा लेखाजोखा


रत्नागिरी, 14 जून (हिं.स.) । २६ मे रोजी केंद्रामधील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारला १२ वर्षे यशस्वीरीत्या पूर्ण झाली आहेत. या पार्श्वभूमीवर, भारतीय जनता पक्षातर्फे आयोजित पत्रकार परिषदेत भाजप नेते आमदार प्रमोद जठार यांनी मोदी सरकारच्या ऐतिहासिक कामगिरीचा आणि जनकल्याणाचा सविस्तर लेखाजोखा मांडला.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गेल्या १२ वर्षांत समाजाच्या शेवटच्या घटकापर्यंत विकास पोहचवून जनतेमध्ये एक नवा विश्वास निर्माण केला आहे, असे प्रतिपादन जठार यांनी यावेळी केले. ते म्हणाले की, २०१४ पूर्वी देशात काँग्रेस किंवा त्यांच्या आघाडीशिवाय अन्य कोणतेही सरकार सलग १०-१२ वर्षे स्थिर राज्य करू शकते, यावर जनतेचा विश्वास नव्हता. १९७७ मध्ये आणीबाणीनंतर जनता पक्षाचा प्रयोग अपयशी ठरल्याने हा अविश्वास वाढला होता. मात्र भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी यांनी लावलेले विकासाचे रोपटे पुढे नेत नरेंद्र मोदी यांनी सलग १२ वर्षे देशात स्थिर आणि पारदर्शक लोकशाही सरकार चालवून दाखवले. राजा किंवा नेता प्रामाणिक आणि काळजी घेणारा असेल, तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या आदर्शावर चालणारे राज्य उभे राहू शकते, यावर मोदीजींच्या कार्यकाळाने शिक्कामोर्तब केले आहे.

मोदी सरकारच्या आर्थिक क्रांतीचा उल्लेख करताना श्री. जठार म्हणाले की, २६ मे २०१४ पासून देशातील गरीब जनतेला मिळणारा प्रत्येक लाभ डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरच्या माध्यमातून थेट खात्यात जमा होत आहे. पूर्वी योजनांचा केवळ १५ पैसे लाभ गरिबांपर्यंत पोहोचायचा, मात्र आता शेतकरी सन्मान योजना, महिला सन्मान योजना यांमुळे १०० टक्के लाभ लाभार्थ्याला मिळतो. अंबानी-टाटांपासून ते अगदी सामान्य नागरिकांपर्यंत देशातील ९० टक्के जनतेचे आर्थिक नियोजन डिजिटल क्रांतीमुळे काटेकोर झाले आहे. ८ नोव्हेंबर २०१६ च्या ऐतिहासिक निश्चलनीकरणाने (नोटबंदी) देशातील भ्रष्टाचाराला मोठा लगाम लावला.

एक देश, एक करअंतर्गत जीएसटी लागू केल्याने देशाची अर्थव्यवस्था मजबूत झाली असून, त्यातूनच आज गरिबांना मोफत धान्य दिले जात आहे. उज्ज्वला गॅस योजना, पीएम किसान योजना आणि सक्षम पायाभूत सुविधांमुळे २५ टक्के जनता गरिबी रेषेच्या वर आली आहे. केवळ आर्थिकच नव्हे, तर देशाचा सांस्कृतिक मानबिंदूही मोदीजींनी उंचावला. ५०० वर्षांचे स्वप्न असलेले अयोध्येतील भव्य राम मंदिर, काशी विश्वनाथ कॉरिडॉरचे पुनरुत्थान आणि जगभरात आंतरराष्ट्रीय योग दिन सुरू करून भारतीय संस्कृतीला जागतिक प्रतिष्ठा मिळवून दिली. ८० टक्के हिंदू समाज असलेल्या या देशात सर्व धर्मांचा सन्मान राखत लोकशाही अधिक मजबूत झाली आहे. अहिल्याबाई होळकर, झाशीची राणी लक्ष्मीबाई आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्यासारख्या महापुरुषांच्या विचारांना या सरकारने खऱ्या अर्थाने सन्मान दिला आहे, असे श्री. जठार म्हणाले.

अन्न, वस्त्र, निवारा, आरोग्य आणि देशाची सुरक्षा या सर्वच आघाड्यांवर मोदी सरकारने अभूतपूर्व कामगिरी केली आहे. या यशस्वी १२ वर्षांबद्दल रत्नागिरी जिल्हा भाजपच्या वतीने पंतप्रधान नरेंद्र मोदी, महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष आमदार रवींद्र चव्हाण यांचे विशेष आभार मानण्यात आले. मोदीजींना निरोगी आणि दीर्घायुष्य लाभो, अशी सदिच्छा आमदार प्रमोद जठार यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केली.

---------------

हिंदुस्थान समाचार / रत्नागिरी


 rajesh pande