
पुणे, 14 जून (हिं.स.)।
आषाढी वारी पालखी सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर देहू येथील पवित्र इंद्रायणी नदीत मोठ्या प्रमाणावर माशांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. गेल्या दोन दिवसांपासून नदीपात्रात मृत मासे आढळत होते. शेकडो मासे मृतावस्थेत पाण्यावर तरंगताना आणि घाट परिसरात वाहून आलेले दिसल्याने एकच खळबळ उडाली आहे.
संत तुकाराम महाराजांच्या देहू नगरीतून दरवर्षी लाखो वारकरी आषाढी वारीसाठी पंढरपूरकडे प्रस्थान करतात. आषाढी वारीसाठी अवघे काही दिवस शिल्लक असताना ही घटना घडल्याने भाविक आणि नागरिकांमध्ये चिंता व्यक्त केली जात आहे.
इंद्रायणी नदीला धार्मिक आणि सांस्कृतिक दृष्ट्या विशेष महत्त्व आहे. नदीकाठी असलेल्या घाटांवर भाविक आचमन, स्नान आणि धार्मिक विधी करतात. अशा वेळी नदीत मोठ्या प्रमाणावर मासे मृत्यू झाल्याने नदी प्रदूषणाचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.
नदीपात्रातील अनेक ठिकाणी मृत मासे पाण्यावर तरंगताना दिसत असून काही मासे किनाऱ्यावर वाहून आल्याने परिसरात दुर्गंधी पसरू लागली आहे. त्यामुळे नागरिकांच्या आरोग्याबाबतही चिंता वाढली आहे.
या घटनेमागील नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसले तरी नदीतील वाढते प्रदूषण, औद्योगिक किंवा सांडपाण्याचा विसर्ग याबाबत विविध शक्यता व्यक्त केल्या जात आहेत. प्रशासनाने तातडीने पाण्याचे नमुने तपासून मासेमृत्यूचे कारण शोधावे आणि प्रदूषण रोखण्यासाठी कठोर उपाययोजना कराव्यात, अशी मागणी पर्यावरणप्रेमी आणि नागरिकांकडून केली जात आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु