
चंद्र, शुक्र, बुध आणि गुरू यांचा मनमोहक संगम
अमरावती, 15 जून (हिं.स.)
आकाश निरीक्षकांसाठी जून महिना खगोलीय घटनांची पर्वणी घेऊन आला आहे. चंद्र-शनी युतीनंतर आता १६ व १७ जून रोजी सायंकाळच्या आकाशात चंद्र, शुक्र, बुध आणि गुरू हे चार तेजस्वी खगोलीय पिंड एकाच परिसरात दिसणार आहेत. ही घटना उघड्या डोळ्यांनी सहज पाहता येणार असून आकाशप्रेमींसाठी एक विलक्षण अनुभव ठरणार आहे. १७ जूनला सायंकाळी पूर्व-ईशान्य दिशेला सूर्यास्तानंतर सुमारे दीड ते दोन तास आधी पाहिल्यास, आकाशात कोरीसारखा दिसणारा क्षीण चंद्र आणि त्याच्या जवळ तेजस्वी शुक्र ग्रह चमकताना दिसेल. शुक्र हा आकाशातील सर्वांत तेजस्वी ग्रह असल्याने त्याला ओळखणे सोपे जाईल. त्याच परिसरात क्षीतिजाजवळ बुध ग्रहदेखील दिसेल. हे तिन्ही खगोलीय पिंड मिळून आकाशात एक सुंदर त्रिकोणी रचना तयार करतील. खगोलशास्त्राच्या दृष्टीने युती किंवा समूह म्हणजे हे पिंड प्रत्यक्षात जवळ आलेले नसतात. पृथ्वीवरून पाहताना ते एका दिशेत असल्यामुळे आकाशात जवळ दिसतात. अशा घटना खगोलप्रेमींना ग्रहांची ओळख करून घेण्यासाठी उत्तम संधी देतात, असे मराठी विज्ञान परिषदेचे अध्यक्ष प्रवीण गुल्हाने यांनी सांगितले.
निसर्गाची अद्भुत कलाकृती सायंकाळच्या वातावरणात पश्चिम क्षीतिजाकडे नजर टाका. कोरीचा चंद्र, तेजस्वी शुक्र आणि बुध ग्रह यांचा मोहक संगम आपल्या डोळ्यांसमोर अविस्मरणीय खगोलीय चित्र उभे करेल. निसर्गाच्या या कलाकृतीचे साक्षीदार होण्याची संधी दवडू नका, असे आवाहन मराठी विज्ञान परिषदेचे अध्यक्ष प्रवीण गुल्हाने तसेच खगोलप्रेमी विजय गिरूळकर यांनी केले आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी