सातारा-सांगलीत भाजप-शिंदे गट आमने-सामने; शंभुराज देसाईंचा भाजपला थेट इशारा
सातारा, 15 जून (हिं.स.) - राज्यातील विधान परिषद निवडणुकीत यंदा राज्याचं लक्ष लागलंय ते नाशिक आणि सांगली-सातारा मतदारसंघातील लढतीकडे. कारण, येथील सातारा-सांगली मतदारसंघात भाजप महायुतीच्या उमेदवारीला अदृश्य बंडखोरीचा फटका बसण्याची शक्यता आहे. कारण,
शंभूराज देसाई


सातारा, 15 जून (हिं.स.) - राज्यातील विधान परिषद निवडणुकीत यंदा राज्याचं लक्ष लागलंय ते नाशिक आणि सांगली-सातारा मतदारसंघातील लढतीकडे. कारण, येथील सातारा-सांगली मतदारसंघात भाजप महायुतीच्या उमेदवारीला अदृश्य बंडखोरीचा फटका बसण्याची शक्यता आहे. कारण, अद्यापही शिवसेनेकडून भाजप उमेदवाराला समर्थन देण्याचा निर्णय झाला नाही. तर, जिल्हा परिषद अध्यक्षांच्या निवडीवेळी झालेला राडा शिवसेना नेते विसरलेले नाहीत. त्यातच, शंभूराज देसाईंकडून सातत्याने नाराजी उघड केली जात आहे.

सातारा-सांगली विधान परिषदेच्या निवडणुकीवरून भाजप आणि शिंदे गटच आमने सामने आल्याचे चित्र निर्माण झाले आहे. भाजपकडून या निवडणुकीत स्वबळाची भाषा करण्यात येत आहे. त्यामुळे शिंदे गटाचे नेते आणि राज्याचे मंत्री शंभुराज देसाई यांनी भाजपवर थेट हल्ला चढवला आहे. तर आम्हालाही वेगळा विचार करावा लागेल, असं सांगतानाच नगरपालिका, जिल्हा परिषद निवडणुकीवेळी तुम्ही प्रतिसाद दिला का? आलेल्या परिस्थितीला भाजपला सामोरे जावे लागणार आहे, असा इशाराच देसाई यांनी दिला आहे.

मंत्री देसाई माध्यमांशी बोलताना म्हणाले की, सांगली- सातारा विधान परिषदेच्या निवडणुकीच्या अनुषंगाने भाजप त्यांचे नगरसेवक, जिल्हा परिषद सदस्य आणि पंचायत समिती सभापतींना एकत्र पर्यटनासाठी नेणार आहे. मी त्याची माहिती घेतली नाही. आमची कोअर कमिटीची बैठक काल झाली. त्याप्रमाणे उद्या आमच्या सर्व सदस्यांचे म्हणणे ऐकून घेण्यासाठी आम्ही बैठक बोलावली आहे. या बैठकीत जे होईल ते वरिष्ठांना सांगितलं जाईल आणि त्यानंतर मुंबईत याचा निर्णय वरिष्ठ घेतील. सदस्यांचा मत काय आहे हे समजून घेतलं तरच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे यावर पुढचे धोरण ठरवतील, असे देसाई यांनी सांगितले. कराडमध्ये झालेल्या महायुतीच्या समन्वय बैठकीला शंभूराजे देसाई उपस्थित नव्हते. याबाबत विचारले असता, पालकमंत्री म्हणून मी नगरपालिका, जिल्हा परिषद निवडणुकीवेळी समन्वय साधण्याचा प्रयत्न केला. मात्र भाजपच्या दोन्ही मंत्र्यांनी त्याला कोणताही प्रतिसाद दिला नाही. पालकमंत्री समन्वय करण्याचा प्रयत्न करत असताना तुम्ही येत नाही आणि समन्वय बैठकीच्या वेळीच तुम्ही जाहीर करता भाजप स्वबळावर लढेल. तुमचा जर असा प्रतिसाद असेल तर आम्हाला ही विचार करावा लागणार आहे, असा इशाराच शंभुराज देसाई यांनी दिला. देसाई यांनी मनातील खदखद व्यक्त करत आलेल्या परिस्थितीला भाजपला सामोरे जावे लागणार आहे, असा सूचक इशाराही दिला आहे.

दरम्यान, 13 तारखेला कराडमध्ये सातारा-सांगली विधान परिषद निवडणुकीसाठी महायुतीच्या समन्वय समितीची बैठक झाली. या बैठकीकडे शिंदे गट आणि राष्ट्रवादीने पाठ फिरवल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं होतं. विधान परिषदेच्या निवडणुकीच्या अनुषंगाने कराडमध्ये भारतीय जनता पार्टीने बोलावलेल्या बैठकीला उदयनराजे भोसले, जयकुमार गोरे, शिवेंद्रराजे भोसले, आमदार अतुल बाबा भोसले आणि चंद्रकांत दादा पाटील उपस्थित होते. या महायुतीच्या बैठकीला मंत्री शंभूराज देसाई आणि मंत्री मकरंद पाटील उपस्थित नव्हते. तर राष्ट्रवादीनेही बैठकीकडे पाठ फिरवली. त्यामुळे जिल्ह्यातील महायुतीत अलबेल नसल्याचं समोर आलं आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / सुधांशू जोशी


 rajesh pande