अलिबागमध्ये हायप्रोफाईल सोसायटीत गांजा सेवन, विदेशी महिलेसह तिघांविरोधात गुन्हा
रायगड, 15 जून (हिं.स.)। अलिबाग तालुक्यातील सारळ येथील हायप्रोफाईल इनर सर्कल सोसायटीमध्ये रविवारी पहाटे पोलिसांनी धाड टाकून गांजा सेवन प्रकरणाचा पर्दाफाश केला. या कारवाईत युक्रेनच्या एका विदेशी महिलेसह तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून परिसर
Shockwaves in Saral! Case registered against three individuals, including a foreign woman, for cannabis consumption in a high-profile society.


रायगड, 15 जून (हिं.स.)। अलिबाग तालुक्यातील सारळ येथील हायप्रोफाईल इनर सर्कल सोसायटीमध्ये रविवारी पहाटे पोलिसांनी धाड टाकून गांजा सेवन प्रकरणाचा पर्दाफाश केला. या कारवाईत युक्रेनच्या एका विदेशी महिलेसह तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.

स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेला सोसायटीतील एका फ्लॅटमध्ये काही गैरप्रकार सुरू असल्याची गोपनीय माहिती मिळाली होती. त्यानुसार पोलीस अधीक्षक आंचल दलाल यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा आणि मांडवा सागरी पोलीस ठाण्याच्या पथकाने संयुक्त कारवाई केली. रविवारी पहाटे छापा टाकला असता काही व्यक्ती पार्टी करत असल्याचे दिसून आले. तसेच दोन व्यक्ती कागदी नळीमध्ये भरलेला गांजा पेटवून त्याचा धूर ओढताना आढळून आले.

पोलिसांनी केलेल्या झडतीत अर्धवट जळालेल्या गांजाने भरलेल्या कागदी नळ्या, लायटर तसेच सुमारे तीन ग्रॅम गांजा असा मुद्देमाल जप्त केला. कारवाईदरम्यान तेथे उपस्थित असलेल्या एका विदेशी महिलेच्या कागदपत्रांची तपासणी करण्यात आली. ती युक्रेनची नागरिक असून तिचा व्हिसा 1 जून रोजी संपुष्टात आल्याचे आढळून आले. भारतात वैध वास्तव्याबाबत तिच्याकडे आवश्यक कागदपत्रे नसल्याचेही तपासात निष्पन्न झाले.

या प्रकरणी सारळ येथील सुनिल चावला (69), मुंबईतील वरळी येथील हरेंद्र सिंग मंगल सिंग (65) आणि युक्रेनच्या महिलेविरोधात अंमली पदार्थ प्रतिबंधक कायदा तसेच विदेशी नागरिकांबाबतच्या संबंधित कायद्यांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मांडवा परिसर पर्यटनासाठी महत्त्वाचा मानला जात असून अनेक बाहेरील नागरिक येथे वास्तव्यास आहेत. अशा परिस्थितीत हायप्रोफाईल सोसायटीत उघडकीस आलेल्या या प्रकारामुळे परिसरात विविध चर्चांना उधाण आले आहे. अंमली पदार्थांचे सेवन, विक्री किंवा साठा याबाबत माहिती असल्यास नागरिकांनी तातडीने पोलिसांना कळवावे, असे आवाहन पोलीस अधीक्षक आंचल दलाल यांनी केले आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / संदेश साळुंके (रायगड)


 rajesh pande