जळगावात उन्हाळी सुट्टीनंतर शाळा पुन्हा गजबजल्या; विद्यार्थ्यांचे उत्साहात स्वागत
जळगाव, 15 जून (हिं.स.) : दोन महिन्यांच्या प्रदीर्घ उन्हाळी सुट्ट्यांनंतर जळगाव जिल्ह्यातील शाळा सोमवारपासून पुन्हा विद्यार्थ्यांच्या किलबिलाटाने गजबजून गेल्या. जिल्ह्यातील तीन हजारांहून अधिक शाळांची घंटा नव्या शैक्षणिक वर्षाच्या पहिल्याच दिवशी खणख
जळगावात उन्हाळी सुट्टीनंतर शाळा पुन्हा गजबजल्या; विद्यार्थ्यांचे उत्साहात स्वागत


जळगाव, 15 जून (हिं.स.) : दोन महिन्यांच्या प्रदीर्घ उन्हाळी सुट्ट्यांनंतर जळगाव जिल्ह्यातील शाळा सोमवारपासून पुन्हा विद्यार्थ्यांच्या किलबिलाटाने गजबजून गेल्या. जिल्ह्यातील तीन हजारांहून अधिक शाळांची घंटा नव्या शैक्षणिक वर्षाच्या पहिल्याच दिवशी खणखणली असून, शिक्षक, पालक आणि विद्यार्थ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले.

शाळेत प्रथमच पाऊल ठेवणाऱ्या चिमुकल्यांचे स्वागत संस्मरणीय करण्यासाठी जिल्ह्यातील अनेक शाळांनी विविध अभिनव उपक्रम राबविले. शाळांच्या प्रवेशद्वारांवर आकर्षक सडे-रांगोळ्या काढण्यात आल्या होत्या, तर अनेक ठिकाणी फुगे आणि फुलांच्या सजावटीने परिसर सजविण्यात आला होता.

काही प्रमुख शाळांमध्ये विद्यार्थ्यांचे ढोल-ताशांच्या गजरात आणि पुष्पवृष्टी करून स्वागत करण्यात आले. त्यामुळे शाळेचा परिसर आनंद आणि उत्साहाने भारावून गेला होता. नव्या शैक्षणिक वर्षाच्या पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांना आनंददायी अनुभव मिळावा यासाठी शिक्षकांनी गुलाबपुष्प आणि चॉकलेट देऊन त्यांचे स्वागत केले.

नवीन पुस्तके, नवीन दप्तर आणि सुट्टीनंतर मित्र-मैत्रिणींशी झालेली भेट यामुळे विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहताना दिसत होता. अनेक विद्यार्थी उत्साहाने आपल्या वर्गांमध्ये दाखल झाले, तर पालकांनाही मुलांच्या शैक्षणिक प्रवासाच्या नव्या टप्प्याची उत्सुकता होती.

दरम्यान, विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने जळगाव जिल्हा पोलीस दलानेही विशेष तयारी केली आहे. शाळा भरण्याच्या आणि सुटण्याच्या वेळेत बसस्थानके, रिक्षा थांबे आणि शाळांच्या परिसरात ‘पोलिस काका’ आणि ‘पोलिस दीदी’ यांची गस्त सुरू करण्यात आली आहे.

विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेबरोबरच वाहतूक व्यवस्थेवर लक्ष ठेवण्यासाठीही पोलीस प्रशासन सक्रिय झाल्याचे दिसून आले. त्यामुळे नव्या शैक्षणिक वर्षाची सुरुवात उत्साह, आनंद आणि सुरक्षिततेच्या वातावरणात झाल्याचे चित्र जिल्हाभर पाहायला मिळाले.

शाळेच्या पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावरील आनंद आणि स्वागतासाठी केलेल्या विशेष उपक्रमांमुळे जळगाव जिल्ह्यात नव्या शैक्षणिक वर्षाचा प्रारंभ उत्साहपूर्ण वातावरणात झाला.

-------------------------

हिंदुस्थान समाचार / मनोहर कांडेकर


 rajesh pande