
मुंबई, १५ जून (हिं.स.) प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्री संचिता उगले तिच्या घरी मृतावस्थेत आढळली. प्राथमिक माहितीनुसार, तिने कथितरित्या आत्महत्या केली आहे. पोलीस या प्रकरणाचा सखोल तपास करत आहेत. या घटनेमुळे मनोरंजन विश्व आणि तिच्या चाहत्यांमध्ये शोककळा पसरली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संचिता मुंबई महानगर प्रदेशातील नालासोपारा येथे तिच्या आई-वडिलांसोबत आणि बहिणीसोबत राहत होती. घटनेच्या वेळी ती घरी एकटीच होती. प्राथमिक तपासात असे दिसून आले आहे की, तिने साडीने गळफास घेतला. माहिती मिळताच, पोलीस घटनास्थळी दाखल झाले, मृतदेह ताब्यात घेतला आणि पुढील तपास सुरू केला. पोलीस अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, प्रकरणाच्या सर्व पैलूंचा तपास सुरू असून, तपास पूर्ण झाल्यावरच यावर स्पष्टता येईल.
संचिता उगलेने 'कुमकुम भाग्य', 'दिलवाली दुल्हा ले जाएंगे' आणि 'साजन घर' यांसारख्या अनेक लोकप्रिय टीव्ही मालिकांमध्ये काम केले होते. तिने चित्रपटांमध्येही अभिनय केला होता आणि अलीकडेच विकी कौशलच्या 'छावा' या चित्रपटात ताराबाईच्या भूमिकेत दिसली होती.
विशेष म्हणजे, तिच्या मृत्यूच्या काही तास आधी, तिने सोशल मीडियावर एक रील व्हिडिओ शेअर केला होता, ज्यामध्ये ती खूप आनंदी दिसत होती. तिच्या आकस्मिक मृत्यूच्या बातमीने चाहत्यांना धक्का बसला असून ते सोशल मीडियावर तिला श्रद्धांजली वाहत आहेत.
---------------
हिंदुस्थान समाचार / वृषाली देशपांडे