
- श्री अंबाबाईचे दर्शन, खा. शाहू महाराजांची घेतली भेट
- मुख्यमंत्री फडणवीस मराठी माणसांसाठी काम करीत आहेत
कोल्हापूर, 15 जून (हिं.स.)। मराठी माणसांसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस काम करीत आहेत असा निर्वाळा मराठा आरक्षणासाठी आग्रही मनोज जरांगे यांनी कोल्हापुरात पत्रकारांशी बोलताना दिला. मनोज जरांगे यांनी आज कोल्हापुरात येऊन श्री अंबाबाईचे दर्शन घेतले. त्यानंतर खा. शाहू महाराज यांची त्यांच्या नवीन राजवाड्यावर जाऊन भेट घेतली आणि मराठ्यानां सरसकट आरक्षण आणि कोल्हापूर गॅझेट यावर चर्चा केली.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रसाद लाड, मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या माध्यमातून योग्य भुमिका घेतली आहे. उप मुख्यमंत्री एकनाथ शिंदेनीही चांगले काम केले आहे. यापूर्वी शासनाची भुमिका फसवणूकीची होती ती करु नये नाहीतर तुमचेच नुकसान होईल. चांगले काम करा आणि मराठ्यांची मने जिंका, राजकारणही तुम्हीच करा असे स्पष्ट मत मांडून आता मात्र मुख्यमंत्री मराठी माणसांसाठी काम करत असल्याचा निर्वाळा दिला. याबरोबरच मराठा कुणबी समाजासाठी स्वतंत्र मंत्रालय असावे, अशी मागणी करून मी जिवंत असेपर्यंत आण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ बंद करू देणार नाही असा निर्धार व्यक्त केला. आरक्षणात सातारा, कोल्हापूर गॅझेट १०० टक्के लागू होणार पण मराठा समाजाने एकजूट होऊन लढले पाहीजे असे त्यांनी सांगीतले. शक्तीपीठ महामार्ग शेतकऱ्यांना नको असेल तर तो करूच नये असेही त्यानी सांगीतले. यावेळी बाबा पार्टे, दिलीप देसाई, शिवसेना ठाकरे गटाचे विजय देवणे आदी उपस्थित होते.
आज सकाळी कोल्हापुरात आलेल्या मनोज जरांगे पाटील यांनी श्री अंबाबाई मंदिरात जाऊन देवीचे दर्शन घेतले. आणि शेतकऱ्यांना न्याय मिळू दे असे साकडे घातले. यानंतर न्यू पॅलेसवर जाऊन खा शाहू महाराज यांची भेट घेऊन चर्चा केली.
मनोज जरांगे ऐन उन्हाळ्यात आंतरवाली सराटी येथे आमरण उपोषणाला बसले होते. त्यावेळी त्यांनी आरक्षणासाठी हैद्राबाद, सातारा गॅझेटचा उल्लेख केला पण कोल्हापूर गॅझेटचा केला नाही. याबाबत खा. शाहू महाराजांनी नाराजी व्यक्त केली होती. मराठा आरक्षणाबाबत राज्य सरकारने घेतलेल्या सकरात्मक भुमिकेमुळे त्यावेळी जरांगे पाटील यांनी आंदोलन मागे घेतले. या पार्श्वभूमीवर आज मनोज जरांगे यांची कोल्हापूर भेट महत्वाची ठरली.
---------------
हिंदुस्थान समाचार / VijayKumar Pandurang Powar