
नवी दिल्ली, १५ जून (हिं.स.) - भारत आणि स्लोव्हाकियाने आपले संबंध 'सर्वसमावेशक भागीदारी'च्या स्तरावर नेण्याचा निर्णय घेतला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी स्लोव्हाकियाची राजधानी ब्रातिस्लावा येथे ही घोषणा केली. ते म्हणाले की, हे दोन्ही देशांमधील सामायिक विश्वास, प्राधान्यक्रम आणि भविष्याचे प्रतीक आहे.
पंतप्रधान मोदी आणि स्लोव्हाकियाचे पंतप्रधान रॉबर्ट फिको यांनी ब्रातिस्लावा येथे द्विपक्षीय चर्चा केली. चर्चेनंतर, दोन्ही नेत्यांनी संयुक्त पत्रकार निवेदन दिले आणि सामंजस्य करारांची देवाणघेवाण केली.
पंतप्रधान मोदींनी भारत आणि युरोपियन युनियन यांच्यातील मुक्त व्यापार कराराला अंतिम स्वरूप देण्यासाठी स्लोव्हाकियाने केलेल्या विशेष सहकार्याबद्दल आभार व्यक्त केले. त्यांनी या कराराच्या लवकर अंमलबजावणीसाठी एकत्र काम करण्यावरही भर दिला. ते म्हणाले की, यामुळे दोन्ही देशांतील उद्योग, स्टार्टअप्स आणि व्यवसायांना सर्वाधिक फायदा होईल.
संरक्षण सहकार्याच्या क्षेत्रात सामंजस्य करारावर स्वाक्षरी झाल्याचा उल्लेख करत पंतप्रधान म्हणाले की, या क्षेत्रातील सहकार्य हे दोन्ही देशांमधील विश्वास आणि सामरिक सामंजस्याचा परिणाम आहे. यामुळे संयुक्त विकास, उत्पादन आणि संरक्षण उद्योग सहकार्याला नवी चालना मिळेल.
पंतप्रधानांनी नमूद केले की, स्लोव्हाक विद्यापीठात एआयवर एक भारतीय अध्यासन स्थापन केले जात आहे. त्यांचा विश्वास आहे की, एआयचे भविष्य केवळ नवोन्मेषावरच नव्हे, तर विश्वास, जबाबदारी आणि मानवी प्रतिष्ठेवरही आधारित असले पाहिजे.
पंतप्रधानांनी दोन्ही देशांमधील संबंध हे सखोल सांस्कृतिक आणि लोकांमधील संबंधांवर आधारित असल्याचे वर्णन केले आणि म्हणाले की, भारताच्या प्राचीन उपनिषदांचे स्लोव्हाक भाषेत झालेले भाषांतर हे आपल्या सांस्कृतिक जवळीकीचे एक उत्कृष्ट उदाहरण आहे. तसेच भारतातील भारतीय वंशाचे लोक अर्थव्यवस्था आणि समाजात महत्त्वपूर्ण योगदान देत आहेत.
२०१७ मध्ये भारताने स्लोव्हाकियाचा पहिला उपग्रह प्रक्षेपित केला. आज, भारत अंतराळ क्षेत्रात अभूतपूर्व वेगाने नवीन उंची गाठत आहे. त्यांनी स्लोव्हाकियन कंपन्यांना विकासाच्या या प्रवासात सामील होण्याचे आवाहन केले.
---------------
हिंदुस्थान समाचार / वृषाली देशपांडे