
मनकाचर (आसाम), 15 जून (हिं.स.) : भारत-बांगलादेश सीमेवरील मनकाचर सेक्टरमध्ये 9 बांगलादेशी नागरिक नो-मॅन्स लँडमध्ये अडकून पडल्याने तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, बॉर्डर गार्ड बांगलादेशने (बीजीबी) या नागरिकांना परत स्वीकारण्यास नकार दिला असून, त्यामुळे दोन्ही देशांच्या सीमा सुरक्षा यंत्रणांमध्ये पेच निर्माण झाला आहे.
या प्रकरणावर तोडगा काढण्यासाठी सीमा सुरक्षा दल (बीएसएफ) आणि बीजीबी यांच्यात अनेक फेरींच्या फ्लॅग मीटिंग्स घेण्यात आल्या. मात्र, अद्याप कोणताही ठोस निर्णय झालेला नाही. सूत्रांच्या माहितीनुसार, पुन्हा दोन्ही पक्षांमध्ये बैठक होणार असून, या प्रश्नावर मार्ग काढण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. रविवारी मनकाचर परिसरात हे 9 जण नो-मॅन्स लँडमध्ये अडकलेले आढळून आले. त्यानंतर सीमावर्ती भागात सुरक्षा अधिक कडक करण्यात आली आहे. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या एका व्हिडिओमध्ये त्यापैकी एक व्यक्ती स्वतःला बांगलादेशी नागरिक असल्याचे सांगत कामाच्या निमित्ताने भारतात आल्याचे नमूद करतो. त्याच्याकडे आवश्यक कागदपत्रे असल्याचाही तो दावा करतो. व्हिडिओमध्ये तो भारतात परत जाण्यास नकार देताना दिसतो. इतर काही व्हिडिओंमध्ये हे नागरिक भावनिक अवस्थेत रडताना दिसत आहेत.
दरम्यान, बीएसएफने अलीकडच्या काळात बेकायदेशीररित्या सीमा ओलांडण्याचा प्रयत्न करणाऱ्या अनेक बांगलादेशी नागरिकांविरोधात कारवाई तीव्र केली आहे. गेल्या आठवड्यात आसाम पोलीस आणि BSF यांच्या संयुक्त कारवाईत 21 कथित घुसखोरांना सीमा पार करण्यापासून रोखण्यात आले होते. या कारवाईचे आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांनी कौतुक केले होते.सीमेवरील या संवेदनशील परिस्थितीवर दोन्ही देशांच्या सुरक्षा यंत्रणांचे बारकाईने लक्ष असून, आगामी बैठकीत या मानवी आणि सुरक्षा विषयक प्रश्नावर तोडगा निघेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
----------------------------
हिंदुस्थान समाचार / मनीष कुलकर्णी