
* शिवसेनेतील शेकडो कार्यकर्त्यांचा भाजपात प्रवेश
मुंबई, 15 जून (हिं.स.) - भाजपात कामं करण्यासाठी प्रचंड वाव आहे. मागाठाणेत कार्यकर्त्यांची मोठी फौज आहे. परिपक्व कार्यकर्ते आहेत. आपल्याला मागाठाणे विधानसभा क्षेत्रही शतप्रतिशत भाजपामय करायचे आहे, असा हुंकार भाजपा गटनेते आमदार प्रवीण दरेकर यांनी बोरिवली (पूर्व) येथे आयोजित करण्यात आलेल्या पक्षाच्या संघटनात्मक बैठकीत फुंकला. यावेळी शिवसेनेतील शेकडो कार्यकर्त्यांनी आ. दरेकर यांच्या उपस्थितीत भाजपाचा झेंडा हाती घेतला.
भाजपा मागाठाणे विधानसभेतर्फे रविवारी बोरिवली (पूर्व) येथील पाटीदार हॉल येथे संघटनात्मक बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीदरम्यान शिवसेनेतील पदाधिकारी महेश शिंदे, हेमंत पांडे, ॲड. विक्रम सिंह यांच्या नेतृत्वाखाली शेकडो कार्यकर्त्यांनी आणि संजय गांधी राष्ट्रीय उद्यान येथील आदिवासी पाड्यातील अनेक तरुणांनी विधानसभा क्षेत्रात होत असलेल्या विकासाकडे बघून आमदार प्रवीण दरेकर यांच्या उपस्थितीत भाजपात जाहीर प्रवेश केला.
याप्रसंगी जिल्हाध्यक्ष बाळा तावडे, मुंबई भाजपा सचिव डॉ. योगेश दुबे, प्रभाग समिती अध्यक्ष व प्र. क्र. ३ चे नगरसेवक प्रकाश दरेकर, महामंत्री आप्पा बेलवलकर, महामंत्री निखिल व्यास, नगरसेविका निशा परुळेकर, नगरसेविका ॲड. सीमा शिंदे यांसह मोठ्या संख्येने पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.
यावेळी बोलताना आ. दरेकर म्हणाले कि, बीएलए २ यांनी अतिशय चांगल्या पद्धतीने मागाठाणेत काम करण्याचा प्रयत्न केला. आज ८० ते ८५ टक्के बीएलए या कार्यक्रमाला उपस्थित आहेत. पक्षाचा कार्यक्रम असो वा आंदोलन असो किंवा कुठलाही उपक्रम असो दिलेले काम नीटनेटके करायचे यात मागाठाणे विधानसभेतील कार्यकर्ता कधीच मागे राहत नाही. प्रामाणिकपणे सर्व कार्यकर्ते काम करत आहेत. त्यामुळे मागाठाणे विधानसभेतील कार्यकर्त्यांचा मला अभिमान आहे. बीएलओ हे शासनाचे अधिकारी विधानसभेत फिरणार आहेत. त्यावेळी बीएलए २ यांनी त्यांच्यासोबत उपस्थित राहावे, अशी विनंतीही दरेकरांनी केली. तसेच एसआयआरची ताकद, त्याचा काय परिणाम होतो हे पश्चिम बंगालमध्ये पाहायला मिळाले. घुसखोर लोक यादीमध्ये घुसवतात, मतदानाच्या दिवशी मतदानही करतात. त्यामुळे एसआयआरचे सर्वेक्षण निवडणुकीच्या दृष्टीने महत्वाचे आहे. सरकार कोणाच्या हातात असावे हे ठरवणारी ही प्रक्रिया आहे. पश्चिम बंगालमध्ये एसआयआरच्या माध्यमातून मतदान कमी झाले नसते तर कदाचित भारतीय जनता पक्ष विजयापासून दूर राहू शकला असता. एवढी ताकद एसआयआरच्या सर्वेक्षणात असल्याचेही दरेकर म्हणाले.
दरेकर पुढे म्हणाले की, आज लोकांच्या झुंडीच्या झुंडी आपल्या पक्षात येताहेत. जे आपल्यापासून दूर गेले त्यांना पश्चाताप झाला असून ते परत आलेत. कारण काही काळापुरते आकर्षण असते, ते दीर्घकाळ राजकारण करू शकत नाही. दीर्घकाळ राजकारण करायचे असेल तर भाजपा शिवाय चांगला दुसरा पक्ष असूच शकत नाही. ज्या पक्षाला पंतप्रधान नरेंद्र मोदींसारखे नेतृत्व आहे, ज्या नेत्याने आपल्या पक्षाचे, देशाचे नाव जगाच्या पाठीवर मोठे केले. तसेच या राज्याला देवेंद्र फडणवीसांचे नेतृत्व आहे. ज्यांनी मुंबईला आकार दिला. मुंबईसह महाराष्ट्र बदलतोय, शेतकऱ्यांना आत्महत्येपासून रोखण्यासाठी कर्जमाफीही करताहेत, अशी नेतृत्व आपल्याकडे असल्याचेही दरेकर म्हणाले.
दरेकर पुढे म्हणाले की, समाजातील सर्व घटकांना सोबत घेऊन समाजाचे हित, लोकांचा विकास करणारा कुठला पक्ष असेल तर तो देशातील एकमेव पक्ष आहे ज्याचे नाव भाजपा आहे. या पक्षाचे नेतृत्व एवढे ताकदवान आहे की, पुढील २०-२५ वर्ष मोदींसारखे नेतृत्व होऊ शकत नाही. ही भाजपाची ताकद आहे. आज आपले सोनेरी दिवस आहेत. केंद्रात, राज्यात आणि महापालिकेतही आपली सत्ता आहे. ज्यावेळी सोनेरी दिवस असतात त्यावेळी भविष्याची काळजी असते. आज आपला चांगला दिवस आहे. त्याचा उपयोग सर्वसामान्यांसाठी, गोरगरिबांसाठी केला पाहिजे. ते काम निश्चितच मागाठाण्यातील कार्यकर्त्यांनी ताकदीने करावे, अशी अपेक्षाही दरेकरांनी व्यक्त केली.
आदिवासी समाजालाही भाजपाचा अभिमान
दरेकर म्हणाले की, आदिवासी बांधवांनाही वाटते भाजपा हा पक्ष आमच्यासाठी आहे. या देशाचे सर्वोच्च असे राष्ट्रपती पद कधीच आदिवासी समाजाला दिले गेले नव्हते. द्रौपदी मुर्मू या आदिवासी महिला आज देशाच्या सर्वोच्च पदी आहेत. आमचा सन्मान पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजपाने केला हा अभिमान आदिवासी बांधव-भगिनींना आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / सुधांशू जोशी